Friday, September 14, 2018

फुकटचा मैत्री भाव !


    एक संन्यासी हिमालयातून चाललेला होता. त्याच्या डोक्यावर ओझे, दुपारची वेळ, कडक ऊन, घाम, थकलेले शरीर अशी त्याची अवस्था. त्याच्या समोर त्या पहाडात राहणारी लहान मुलगीही चाललेली होती. तिच्या खांद्यावर तिचा लठ्ठ, वजनदार लहान भाऊही होता. साधुला दया वाटून त्याने सहानुभूतीने त्या मुलीला विचारले, ‘मुली, खुप वजन असेल त्याचे, एवढे ऊन, कठीण चढ !’ त्या मुलीने हैराणीने त्याच्याकडे बघितले. म्हणाली, ‘हे आपण काय म्हणत आहात ? वजन तर तुमच्या डोक्यावर आहे, हा तर माझा छोटा भाऊ आहे !’ साधु स्वत:शी म्हणाला, "‘मी खूप शास्त्र वाचले पण असे अद्भूत वचन ऐकले नाही. मला पहिल्यांदाच कळाले की छोट्या भावामध्ये वजन नसते."’ हृदयातल्या प्रेमभावनेला वजन नसते. प्रेम वजनाला नष्ट करते. माणूस हलका होतो.
      छोट्या छोट्या कामांनाही वजनदार बनवता प्रेमाने हलके करता येईल.
      ध्यान अवस्थेनंतर अनुभवाला येणारी प्रगाढ शांती आणि गहन तृप्ती चे एकमेव कारण हे असते की आपण आपल्याबरोबरच जगताशीही तादात्म्य पावलेलो असतो. आपल्यातले चैतन्य जगतातले चैतन्य कळत नकळत एक झालेले असते. ध्यानावस्थेत आपण विराटाकडे झेप घेतलेली असते त्यामुळे ध्यानानंतर आपणहून समग्र जगताविषयी प्रेम व मैत्री वाटायला लागते. किंबहुना ध्यानापूर्वी जरी आपण थोडी जगत मैत्रीविषयी कल्पना केली तरी एक अद्भूत शांती अनुभवयाला येते.
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन। सुखं वा यदि वा दु:खं स योगी परमो मत:॥6-32॥- हे अर्जुन ! जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांना समभावाने पाहातो, तसेच सर्वांमध्ये सुख वा दु:ख समदृष्टीने पाहातो, तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो.
हा मैत्रीपूर्ण समत्वाचा भावच वैश्र्विक मैत्रीचे स्पंदन आहे.
म्हणौनि असो ते विशेषे। आपणपेयासारिखे । जो चराचर देखे। अखंडित॥6-404॥
या अखंडीत भावनेसाठी मात्र ध्यानात उतरायला लागेल.
      थोडी कल्पना करूयात वा प्रयोग करून बघुयात ध्यानाला बसल्यावर, रस्त्याने चालताना, उठताना, बसताना, एकांतात कुठेही सगळीकडे आपलेच प्रेमळ मित्र आहेत. वस्तु, व्यक्ती, पक्षी, वृक्ष, प्राणी सगळेजण आपले मित्र आहेत. मैत्री प्रेम आपल्याला परिव्याप्त करीत आहे. हा मैत्री धारणेचा प्रयोग सर्वात सोपा आहे.
      या प्रयोगानंतर आपल्याला चित्तामध्ये या मैत्रीभावनेमुळे आपोआप शांती येण्यास प्रारंभ होईल. जगताविषयीचा दुर्भाव अशांतीचे कारण आहे. विशेष म्हणजे रात्री झोपताना हा प्रयोग करून झोपाल तर सकाळी एका अभिनव शांतीसह आपल्याला जाग येईल. सकाळी उठल्यावरही या भावनेला पुन्हा जागवा. सतत चोवीस तासात जेव्हा स्मरण होईल या भावनेला प्रवाहीत होऊ द्यात.
      आपल्याला अनुभवाला यायला लागेल की आपल्या भोवतालचे समग्र जगतही आपल्यावर प्रेम करायला लागलेले आहे. आपल्याविषयी तेढ असणारे अचानक आपल्याशी प्रेमाने बोलायला लागलेले आहेत. कारण आपल्या संवेदनाही इतरांच्या अस्तित्वाला छेदून जातात. कुठेही जाताना आपल्या चैतन्याचे एक वलय घेऊन आपण फिरत असतो. आपले पॉझिटीव्ह, निगेटीव्ह तरंग इतरांना प्रभावीत करत असतात. बुमरँगसारखे सारे आपल्याकडे परत येत असते. त्यामुळे आपण सकारात्मक तरंग निर्माण केले पाहिजेत. यामुळे आपली अनेक कामे होतील.

Wednesday, September 5, 2018

संसार सुफळ जाला गे माये !

संसार सुफळ जाला गे माये !

    ज्ञानाची यात्रा द्वैतापर्यंतच, भक्तिची यात्रा पुढे सुरुच राहते ! दिंडी चालतच राहते ! मनाला द्वैत कळते. लाट व सागर वेगवेगळे वाटतात. पण उठलेली लाट सागरच नाही का ? भक्तिसूत्र आहे- युक्तौ च सम्परायात् । वियोगाच्या आधी दोन्ही एकच आहेत. जसं जन्माच्या आधी आई व बाळ एकच असतात, तसा भेदही वरवरचा आहे. जेव्हा आपण नव्हतो तेव्हा आपण कुठे होतो हा विचार किती गंमतीचा आहे.
    अनेक जन्मांचा आपला स्वत:चा शोध कुठल्यातरी जन्मात मी कोण ? या परमप्रश्‍नाचे गहन विश्‍लेषण करायला भाग पाडतो. आणि संभावना शक्य वाटायला लागतात. वारकर्‍याची वारी अनेक जन्मांपासून चालूच आहे. आतल्या विठ्ठलाचे स्मरण येईपर्यंत. त्या अज्ञाताचे आश्‍वासित अनंत हात सांभाळताना भानही देतात की मी माझ्या गर्भात मलाच बाळगुन होतो. किंबहुना तो गर्भ त्याच अनंताचा आहे. मी रोज होत जाणारा परमात्मा आहे ! वारीत नाचता नाचता, भजन गाताना, एकांतात मौनामध्ये कुठल्यातरी क्षणाला आलेलं हे भान किंमतीचं होतं, मग संसाराला दु:खमय म्हणून करत असलेली व्याख्या बदलून जाते. एकदम पिंजर्‍यातून मोकळं सुटल्यावर पक्ष्याला व्हावं तसं वाटायला लागतं.
    संसारव्यथे फिटला। जो नैराश्ये विनटला। व्याधा हातोनि सुटला। विहंगु जैसा॥ (ज्ञा.12-181) हा भक्त कसा असतो ! पारध्याच्या हातून सुटलेला पक्षी स्वैरपणे विहरतो, तसा हा भक्त संसारातील नाना क्लेश, नैराश्य, व्याधींपासून मुक्त होतो व इच्छारहित होऊन या संसारात विहरु लागतो. म्हणून अंतरयात्रेची वारी हा योग्याचा आनंदमय प्रवासच असतो !
    इथे ‘संसारव्यथा’ म्हणजे संसार हीच व्यथा असे नसून संसारात असलेली व्यथा अशी व्याख्या करावी लागते. तेव्हा सुखाचा विस्तार म्हणजे संसार असा प्रत्यय येतो. कारण तो त्या शक्तीचीच अभिव्यक्ति नव्हे का ? शक्तित्वान्नानृत वेद्यम्- शक्ति ही क्रिया आहे, यामुळे हे जग मिथ्या नाही. (भक्तिसूत्र) केवळ चिद्विलास !
    संसार म्हणून जी व्याख्या मन करते ती केवळ वस्तुनिर्देशाने आहे. अपरिच्छिन्न असा परमात्मा, त्याच्या लीलारुप जगताशी भ्रांतिकाळांत आलेला जीवाचा संबंध म्हणजे संसार. भ्रांती मिटताच जन्ममरणाचे स्वइच्छेने केलेले आवागमनही स्वसुखच असते.  तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ! हे उद्गार तेव्हा निघतात.
    सुख हे माझ्या बाहेर आहे असं वाटणं म्हणजे काम ! असा देहबुद्धी असलेला जीव मी कर्ताच्या भावनेने जखडलेला, स्वकेंद्राबाहेर सुखाला शोधत फिरतो, त्याच्यासाठी संसार सुखदु:खमय ठरतो. जन्म विषयांची आवडी। जन्म दुराशेची बेडी। जन्म काळाची कांकडी। भक्षिताहे॥दासबोध, द.3, स.1, 9॥ असे नकारात्मक उद्गार निघु लागतात.
    ही भ्रांतीरुप स्थिती म्हणजे व्यथा ! पण चिदानंदी मग्न पुरुषाला ‘आजी संसार सुफळ झाला गे माये !’ असं वाटु लागते. कारण देखिएले पाय विठोबाचे ! विठोबाचे पाय बघणं म्हणजे स्वत:चं दर्शन होणं. पाहावे आपणासि आपण या नाव ज्ञान ! असं समर्थ म्हणतात. त्याची माया सुटते. चिद्रुप विस्ताराचे स्वरुप भ्रांतीच्या विलक्षण माध्यमातून प्रकट होते तेव्हा तीला ‘माया’ म्हणावे ! ‘माया’ अर्थात ‘मेय’ म्हणजे ज्याला मोजता येते अशी गोष्ट. पण जे फुटपट्टीत सापडत नाही त्याचं भान संतत्व देऊन जाते.
    जो भगवंताचा भक्त। तो जन्मापासून मुक्त। ज्ञानबळे विरक्त। सर्वकाळ॥(दा. दशक 3, स. 2, 52) हे भान यायला कृपाच हवी. अन्यथा नियती व काळ यांच्या सत्तेखाली जीवाला अनिच्छेने जन्म घ्यावा लागतो. काळ म्हणजेच वासना. काळ वासनेची निर्मिती आहे. वासनामय जीवाला मृत्युची भिती वाटते कारण मृत्युमुळे काळ थांबतो. वासना शिल्लक आहेत पण मृत्यु समोर आहे. ययाती आपल्या पुत्रांनाही त्यांचं आयुष्य मागतो तरी हजार वर्षात वासना संपत नाहीत. वासना पूर्तीसाठी वेळ, भविष्यकाळ पाहिजे. उद्याच्या आशेवर प्रत्येकातला ययाती जगणं चालु ठेवतो. ‘आत्ता’ आपल्याला राहता येत नाही, पण तसं झालं तर चालू क्षणात इच्छा करणं मुश्किल होतं कारण ‘आत्ता’ असा कितीसा आपल्या हाताने पकडता येतो ? तो ‘आत्ता’ म्हणेपर्यंत भूतकाळात जमा होतो.
    वासनातीत होणं म्हणजेच कालातीत होणं. काटे नसलेलं घड्याळ होणं. जाणीवेला वासनेचा स्पर्श झाला की काळ निर्माण होतो. अस्तित्वात काळ नसतो. शुद्ध जाणीव म्हणजे अस्तित्वमय होणं. पृथ्वीवरुन माणुस हरवला तर काळ संपून जाईल. संभ्रमित जीवाला जगाचे होणारे अयथार्थ ज्ञान म्हणजेच संसार. बस भ्रांती मिटायला हवी !
    असा निभ्रांत, विदेही झालेला पुरुष कितीही संसारी रमलेला दिसला तरी तो नित्यमुक्तच ठरतो. आरशात प्रतिबींबे उमटत राहावीत, परत परत नवीन उमटावीत पण आरशाला काही चिकटत नाही तशी दशा होते. विश्‍वामाजी अक्षर क्षरले साचार। त्या रुपा आधार पुससी काई॥ आपणचि विश्‍व आपणचि विश्‍वेश। जेथे द्वेषाद्वेष मावळले॥ (निवृत्ती 349) मग विश्‍व हेच विश्‍वेश, विश्‍वेश हाच विश्‍व ! द्वैताच्या व्याख्या संपल्या ! कारण त्या अक्षराचे आलेले स्मरण !
    मग संसार म्हणून काही वाटणे, जन्म मरण म्हणून केलेली स्वचेतनेची व्याख्या मावळते. अरे जे जालेचि नाही। त्याची वार्ता पुससी काई। (दास.8-3-1) केवळ श्रीहरीचे प्रेमरुप चिंतन हाच या भ्रांतीरुपाला उतारा. तृष्णा जेव्हा कृष्णा होते, भ्रांती निभ्रांतीत जाते तेव्हा अवघा रंग एक झाला ! मग सारे रंग माझेच ! आता सत्य-मिथ्या म्हणून कशाची व्याख्या करु ? संतांनी पालख्या उचलल्या, ही अनंताची वारी कधीतरी समाप्त होऊ शकते काय ? मग नाचणे व हरिपाठ गाण्याशिवाय पर्याय तो काय ? जय हरी !

Wednesday, April 25, 2018










चंचळ नदी

अद्भूत गंगा अधीर निघाली
कधी कुठे ते कोणा कळले ?
चंचळ गुप्त नदीचे सुंदर
वळणे वाकणे उकळ तरंगे ॥

कधी खळाळ कधी भळाळ
शुष्क डगर अन कधी धबाबे
सैरावैरा उदकाचे ते
अणूरेणू मोजून घ्यावे ॥

दगड दर्कुटे खडके बेटे
वळसे घालत आपट चापट
नाजुक चिरडीत जीव बिचारे
किती अडकले फसून गेले ॥

अधोमुख ते गहन बुडाले
वळशामध्ये फुगुन मेले
गोल गोल ते भोवर्‍यामध्ये
ओबडधोबड बोथट झाले ॥

एक मात्र ते वीर खरोखर
उफराटे पोहत गेले
उगमाच्या त्या गोमुखासी
तीर्थरुप ते पवित्र जाले ॥

आपोनारायण नारायण
माहानदीने ओळख दिधली
दिशा दिशांच्या अंगणात ती
स्वर्गमृत्यूपाताळ स्पर्शली॥

सर्वव्यापी उभा जगदीश
त्याच्यासम ती तिथे तिष्ठीत
घटाघटातून तिचे पाझर
अनंत पात्रे उदके वाहत॥

तुरट तिखट गुळचट कडवट
जिथे जिथे मिसळून तद्रुप
विष अमृते मिळोन जाती
गंधांचेही घेती रुप॥

उगमाच्याही पलिकडे ती
अलिकडे ही अपरंपार
तेच जाणती गहन जे गेले
वृत्तिशून्य योगेश्‍वर ॥

कवी- दामोदर प्र. रामदासी
आधार- चंचळनदी, दासबोध - दशक 11 समास 7

Thursday, January 18, 2018

स्वत:च्या दिव्य अस्तित्वाचा स्वीकार

स्वत:च्या दिव्य अस्तित्वाचा स्वीकार
 
का पूर्ण कुंभ उलंडला। तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला। परी भानु नाही नासला। तयासवे॥ज्ञाने.2-41॥

पाण्याने भरलेले भांडे पालथे केल्यावर त्यातील सूर्यप्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते; परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर खरा सूर्य मात्र नाश पावलेला नसतो.

न जायते म्रियते वा कदाचिन्
नायं भूत्वा भविता वा न भूय:।
अजो नित्य: शाश्‍वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे॥20॥
वेदाविनाशिनं नित्यं य एन मज मव्ययम्
कथं स पुरुषं पार्थकं घातयति हन्ति कम्॥21॥

    प्रत्येक जीवाचे दिव्यत्व कधी न संपणारे आहे, चेतना नित्य, सनातन, न बदलणारी, अजन्मा, अमृत अशी आहे. गीतेतील दुसर्‍या अध्यायाच्या 20 आणि 21 व्या श्‍लोकावर टिका करताना, सिद्धांत समजावून सांगताना ज्ञानदेव हा दृष्टांत सांगतात.
    स्वत:च्या दिव्यत्वाचा अनुभव म्हणजेच उगमस्थानाकडे अर्थात वारकर्‍याचे विठ्ठलाच्या राउळात पोहोचणे होय. भक्तिच्या नादात व भावमग्न नृत्यात दिब्यत्व जागते. प्रत्येकजण प्रेमळ माऊली होतो. म्हणून प्रत्येक विनम्र, प्रेमळ वारकरी स्वत:हून माऊली माऊली म्हणत, एकमेकांचे दर्शन करतात. दिव्यत्व ठायी ठायी दिसू लागते. स्वत:च्या दिव्यत्वाच्या दिशेने केलेला हा आनंदमय प्रवासच पंढरीची वारी आहे. ‘स्व’ मताबाबत कट्टरपणा, अविवेकवाद जिथे जगात वाढताना दिसत आहे जसा मी दिव्य आहे तसा प्रत्येकजण दिव्यच आहे अशा संस्कारांचे, सूत्रांचे बालमनावर रोपण करणे आज काळाची गरज आहे. ज्याला स्वत:विषयी आदर आहे त्यालाच दुसर्‍याविषयी आदर असु शकतो. माझ्यासारखेच सगळे आहेत. हा समानता, बंधुत्वाचा संभावित विचार मेंदूच्या पेशींवर कोरला गेला तर जात, पंथ, प्रांताचा अहंम् मावळल्याशिवाय राहणार नाही. हा आंतरमनावर उमटलेला ठसा कार्यातही प्रतिबिंबीत होइल. ते कार्यही दिव्य होईल. कुशलतम् कार्य सर्व स्तरावर उंची वाढवेल. प्रगतिपूरक ठरेल. एखादी व्यक्ति ‘वारकरी’ होण्याची हीच प्रक्रिया आहे.
    आयुष्याच्या वाटचालीत पराभवाचे क्षण आल्यावर हत्या वा आत्महत्येचा नकारात्मक विचार शिवलेल्या, त्या खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी ही ओवी मंत्रासमान आहे. मी नाहिसा होईन वा मी कोणाला नाहिसा करेन असे म्हटल्याने काय चैतन्य नाहिसे होते ? विज्ञानाचा सिद्धांत आहे, जगात काही जन्मतही नाही वा नाहिसेही होत नाही केवळ रुपांतरीत होते. निसर्गाचा हा सनातन सिद्धांत आहे.
    उपनिषद काळातील ऋषी प्रथम मानवाच्या दिव्यत्वाची उद्घोषणा करताना दिसतात- श्रृण्वन्तु विश्‍वे अमृतस्यपुत्रा आ ये धामानि दिव्यानि तस्यु:। वेदाहमेतं पुरुषं महान्तमादित्यवर्णं तमस: परस्तात्॥श्‍वेताश्‍वेतर उपनिषद -2.5 व 3.8॥ मानवाला अमृताचे पुत्र (दिव्यत्वाचे अंश) म्हणून सन्मान देणारा हा भारतीय विचार यामुळेच जगात एकमेवद्वितीय ठरतो.
    स्वामी विवेकानंदांचे वाक्य आठवते. हे वाक्य मेंदूची भाषा व्हायला हवे. स्वामीजी म्हणतात-‘ईश्‍वराचे पुत्र तुम्ही ! तुम्ही अमृताचे अधिकारी, पवित्र, पूर्ण. तुम्ही या मर्त्यभूमीवरील देवता. तुम्ही पापी ? अशक्य ! मानवाला पापी म्हणणेच महापाप. विशुद्ध मानव आत्म्यावर तो मिथ्या कलंकारोप मात्र आहे. बंधुंनो ! तुम्ही सिंहस्वरुप असूनही स्वत:ला मेषतुल्य का समजता ? उठा मृगराजांनो उठा, आणि आपण मेंढरे आहोत हा वृथा भ्रम झाडून टाका. तुम्ही जरामरणरहित, मुक्त आणि नित्यानंदस्वरुप आत्मा आहा.’
हरि ॐ तत् सत्