Friday, October 5, 2018

छोट्या छोट्या संकल्पांचे प्रयोग- आंतरिक क्रांतीसाठी

  
सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपल्याला शांत होण्यासाठी खुप संधी मिळतात. पण सजग राहण्याचा अभ्यास नसेल तर अनावश्यक हालचाली, कामं, अति विचार यातून आपण स्वत:ची ऊर्जा अनावश्यक वाया घालवत असतो. काही सेकंदांसाठी, मिनिटांसाठी अगदी छोटे छोटे संकल्प करुन हळूहळू आपण रुपांतरणाला सुरुवात करु शकू. जसे अगदी सकाळी ब्रश करताना काल काय झाले याचा विचार करण्यापेक्षा पुढचे काही सेकंद तो ब्रश दातांवरुन चालवताना ज्या संवेदना उठतात त्याबाबत मी सजग राहील किंवा कार चालवताना आज रस्त्यावरचे बोर्ड मी उगाच वाचणार नाही. आजचे वर्तमानपत्र वाचणार नाही, बँकेच्या रांगेत उभे आहोत तर काही सेकंदासाठी डोळे मिटेल, आजुबाजुच्या वातावरणातील आवाज ऐकेन, जेवायला बसलो तर भाजीचा स्वाद, रंग, तोंडात जीभ फिरणे याची जाणीव ठेवेन, काही सेकंद अगदी काहीच विचार उत्पन्न होऊ देणार नाही. केवळ जाणीव ठेवेन ! संध्याकाळी पुढील दोन तास टीव्ही नको बघायला किंवा खुर्चीवर बसल्यावर पंधरा-वीस श्‍वासप्रश्‍वास माझ्या साक्षीने चालतील. चला आज रात्री लवकर झोपूयात ! उद्या पहाटे ब्राह्ममुहुर्ताला चार वाजता उठून बघु, आज एखादा प्राणायाम करुन बघु !, आज किमान दोन तरी सूर्यनमस्कार घालू, पुढील काही सेकंद चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवेन, कोणाला एखादा आज भारी विनोद सांगून खळखळा हसवेन. काय असे संकल्प आपण करु शकू ? बघु तरी काय होते.
    तुम्ही म्हणाल खरंच यामुळे काही फरक पडतो का ? माझा अनुभव सांगतो, क्रांती एकदम होत नाही, पण छोटे छोटे प्रयोग हळू हळू बदल घडवतात. मन ही सतत चाललेली घटना आहे. त्यामुळे आत्ता या क्षणाला या घटनेप्रति सजग व्हायला हवे. छोटे छोटे काही सेकंदाचे हे प्रयोग तणावपूर्ण वाटणार नाहीत. आपण आपल्याशीच खेळलेला गंमतीशीर खेळ होईल. यातूनच आपण हळूहळू आत्मवान होत जाऊ ! मनाची अराजक क्रिया कशीही करुन थांबवाच !
    खरं सांगा, आपण कुठला राजकीय वा जागतिक उलाढालीचा वा एखाद्या व्यक्तिचा विचार केल्यामुळे काय फरक पडणार आहे ? जग अनादी काळापासून चालूच आहे, अनेक जागतिक समस्या, मानवी प्रश्‍न, राजकीय गुंतागुंत हे चालूच आहे. आपण या जगात नव्हतो त्यावेळीही हे सर्व चालूच होते वा उद्या आपण हे जग सोडून जाऊ तेव्हाही हे सर्व चालूच राहील. पण आपल्याला मिळालेला जन्म आपण उगाच काही अनावश्यक क्रियांमध्ये वा विचारांमध्ये वाया घालवत आहोत, धावतोय खूप पण पोहोचत मात्र नाही. हा रोजचाच अनुभव आहे. पण हे अनावश्यक विचार सोडल्यामुळे मात्र आपल्यात क्रांतीकारक बदल होऊ शकतात. ही आपली अतिशय व्यक्तीगत, आंतरिक यात्रा आहे. छोटी छोटी पावलं खुप अंतर गाठू शकतात. या जगात किमान एकतरी सघन, समजदार, विवेकपूर्ण नवीन व्यक्तित्व आपण आपल्यात जन्माला घालू शकतो. ही सुद्धा जगाची एक समस्या सोडवण्याची युक्तीच नव्हे का ?