Wednesday, July 3, 2019

ज्ञानाचे महाद्वार व ध्यानाचे विज्ञान

   
सर्वसाक्षी अवस्ता तुर्या। ज्ञान ऐसें म्हणती तया । परी तें जाणिजे वायां। पदार्थज्ञान ॥दास.5-6-6॥
    स्वामी राम यांच्यावर 1977 साली यू. एस. के मेन्निंगर फाउंडेशन येथे प्रयोग केले गेले. डॉ. एलमर ग्रीन च्या निर्देशानुसार विद्युत मस्तिष्क लेखीवर स्वामी राम यांच्या मेंदू तरंगांना रेकॉर्ड केले गेले. हा प्रयोग तेव्हा केला गेला जेव्हा स्वामी राम ध्यानाच्या गहन अवस्थेमध्ये क्रमश: आपल्या शारिरीक, मानसिक व भावनात्मकतेला विश्राम अवस्थेमध्ये आणत होते. हे रेकॉर्डिंग वैज्ञानिक जगताला नवीन रहस्योद्घाटन ठरले. स्वामी राम स्वेच्छेने चेतनेच्या विविध स्थितीमध्ये प्रवेश करण्याची क्षमता दाखवू शकले. याचे प्रमाण म्हणजे त्यांच्या मेंदूची विद्युतीय क्रियाविधीमध्ये असाधारण बदल दिसले. योगनिद्रेच्या गहन स्थितीमध्ये प्रवेश करताना त्यांनी निळे आकाश व उडणार्‍या पांढर्‍या ढगांची कल्पना करुन मेंदूमध्ये पाच मिनिटांपर्यंत 70% अल्फा तरंग उत्पन्न केले. नंतर स्वप्नावस्थेमध्ये प्रवेश करुन पाच मिनिटे 75% थीटा तरंग निर्माण केले. ते म्हणाले की मानसिक गोंधळाच्या स्थितीतून चेतन मनाला शांत करत त्यांनी अचेतन मनाला कार्यशील करुन प्रवेश केला. या अवस्थेत त्यांनी कामना, महत्त्वाकांक्षा व भूतकाळातील स्मृतींना एक एक करुन आपल्या मूळ रुपामध्ये अचेतनातून क्रमबद्ध रुपाने जलदगतीने निर्माण होताना बघितले. पण ते मात्र या प्रत्येक संस्काराच्याप्रति सजग, जागरुक, सावध होते. नंतर स्वामी रामांनी गहन निद्रेत (अचेतन) प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या मेंदूमध्ये धीमी लय असलेले डेल्टा तरंग दिसले. ते मात्र या सर्व परिक्षणात सजग होते. त्यांची ही अद्भूत नियंत्रण शक्ती प्रयोगशाळेच्या वातावरणात सर्वांनाच विलक्षण वाटली.
    चेतन विचार, संवेदना, हालचाली यांचा अभाव झोपेचे लक्षण आहे. योगशास्त्रात याला प्रत्याहाराची एक अवस्था म्हटले आहे. आपली चेतना स्वाभाविक रुपात ज्ञानेंद्रिय वा कर्मेंद्रिय यांच्या अनुभवाने पृथक होते व मेंदू तसेच मोटर कॉर्टेक्सचा बाह्य वातावरणाशी असलेला संबंध हळूहळू समाप्त होत जातो. असे झाल्यामुळे चेतना हळू हळू बाह्य कर्मांपासून हटून अंतर्जगताच्या दिशेने किंवा आपल्या मूळ स्रोताकडे म्हणजे सहस्रार चक्राकडे परतू लागते.
    इंद्रियांची कार्यप्रणाली एकामागोमाग एक क्रमबद्ध ढंगाने शांत होत जाऊन सजगता अंतर्मुखी होऊन मनाच्या गहन स्तरांच्या दिशेने जाऊ लागते. सर्वप्रथम झोपेत गंधाशी वेगळेपण येते ज्याचा संबंध मूलाधार चक्राशी वा पृथ्वी तत्त्वाशी आहे. गंधानंतर स्वाद ज्याचा संबंध स्वाधिष्ठान चक्राशी वा आप तत्त्वाशी आहे. बघण्याची क्षमता जी मणिपूरचक्राची तन्मात्रा आहे समाप्त होते. त्यानंतर स्पर्शाचे स्थान आहे जे अनाहत व वायू तत्त्वाशी संबंधीत आहे व शेवटी श्रवणेंद्रियाचे स्थान आहे. जे विशुद्धी व आकाश तत्त्वाशी संबंधीत आहे.
    ध्यान अभ्यासात योगनिद्रा झोपेची अशी अवस्था आहे जी जागृत वा स्वप्नावस्था यांची सीमारेषा आहे.
    जाग्रत, स्वप्न, सुषुप्ति
    जाग्रत अवस्थेत मन ज्ञानेंद्रियांच्या प्रभावाने बाह्य व्यवहाराशी संलग्न राहते. यावेळी वेगाने बीटा तरंगांनी प्रभावीत राहते. स्वप्नावस्थेमध्ये जेव्हा अवचेतन मनाचा प्रभाव राहतो तेव्हा दबलेल्या भावना, भय, संस्कार सक्रिय होऊन बाहेर येतात. तेव्हा थीटा तरंगांचा प्रभाव असतो. गहन निद्रा वा सुषुप्तिमध्ये अचेतन मन जे मूळ प्रवृत्तीचा स्रोत आहे ते संचालक बनून अधिक गहन स्तरावर दबलेले अनुभव प्रकट करते. गहन निद्रेत असताना स्वप्नावस्थेच्या विपरीत सर्व मानसिक क्रिया, हालचाली शांत होतात. या अवस्थेत संस्कार व वासना निष्क्रिय होतात व शरीर व मन जणु पक्षाघाताच्या स्थितीमध्ये आलेले असते. चेतना व प्राण समानत: व्यक्तिच्या शरीर व मनापासून विलग होऊन माघारी अव्यक्त, सृजनात्मक स्रोताकडे जाते. याला ब्रह्मरात्री किंवा हिरण्यगर्भ असे म्हणतात. यावेळी मेंदूमध्ये हळूवार डेल्टा तरंग असतात जी ब्रह्मांडाच्या आधारभूत कंपनाची आवृत्ती आहे.
    निद्रा व जागृतावस्थेच्या मध्ये सजगता व अनुभवाचे एक पृथक महत्त्वपूर्ण क्षेत्र असते. याला मनोविज्ञान संमोहनाची स्थिती म्हणते. ही परिवर्तनशील अवस्था अधिकाशिक 3-5 मिनीटांची असते. यावेळी अल्फा तरंग दिसू लागतात. यावेळी क्रमिक रुपातील गहन शिथील प्राप्त होत जाते. शरीरातील मांसपेशी तणावमुक्त होतात, बाहेरच्या वातावरणाप्रति सजगता समाप्त होते. ज्यावेळी जागृतावस्थेचे भान संपते तसे त्याजागी स्वप्नावस्थेचा अनुभव घेऊ शकतो.
    ही योगनिद्रा इंद्रिय चेतना व निद्रावस्थेच्या चेतनेच्या मधली अवस्था आहे. सामान्य निद्रेच्या पूर्व येणारी अल्पकालिक संमोहनाच्या अवस्थेचा विस्तार करुन योगनिद्रेच्या या अवस्थेत प्रवेश केला जातो. योगनिद्रेमध्ये सूचनांचे मानसिक रुपामध्ये पालन करुन बाह्य सजगता काही सीमेपर्यंत टिकवून ठेवत मेंदूला वेगळे करुन योगी अंतर्मुखी बनतो.
    या अभ्यासावेळी एकामागोमाग क्रमाने बीटा व थीटा तरंगांची प्रधानतेचा अवधी असताना नियमित वेळेला अल्फा तरंग उत्पन्न होतात याचा अर्थ हा झाला की चेतना खूप काळापर्यंत जागृती व निद्रा यांच्या मधे फिरत राहते. कधी अंतर्मुखी होते तर कधी बहिर्मुखी. बहिर्मुखतेने जागृत अवस्था किंवा इंद्रिय सजगता येते व अंतर्मुखता स्वप्नमय निद्रेमध्ये घेऊन जाते. या दोघांमध्ये अल्फा तरंगांच्या प्रभावामध्ये सजग व जागरुक राहिल्यामुळे गहन विश्रांतीचा अनुभव येतो. हि स्थिती सामान्य निद्रेपेक्षा अधिक फळ देणारी व चेतनेच्या उच्च स्तरावर जाण्याचे प्रवेशद्वार उघडे करुन देते. बर्‍याचदा सकाळी झोपेतून उठल्यावरही थकल्यासारखे वाटते. झोपेत गहन विश्रांती तेव्हाच येते जेव्हा अल्फा तरंग आपला प्रभाव टाकतात.
तुर्या वा सर्वसाक्षिणी अवस्था
    ध्यान वा योगनिद्रेच्या सतत अभ्यासामुळे चेतनेच्या प्रारंभिक म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ति वा गहन निद्रा या तीन अवस्थांना पार करुन चेतना चौथ्या अवस्थेपर्यंत पोहोचते. साक्षीत्वाच्या अभ्यासामुळे स्वत:च्या स्वप्नांनाही योगी बघु शकतो. साक्षी चेतनेला झोप व स्वप्न यांच्या मध्ये जर स्थिर करता आले तर मेंदूच्या केंद्रिय तंत्रिका तंत्र व त्याची कार्यप्रणीला याच्यामध्ये एक चमत्कारी परिवर्तन आणता येते. या परिवर्तनामुळे चेतनेची चौथी अवस्था वा तुर्या स्थितीचा अनुभव येतो. ही चेतनेची एकदम भिन्न स्थिती असून ज्यामध्ये सामान्य जागृत अवस्थेच्या इंद्रिय बोधाबरोबर सूक्ष्म स्वप्नावस्थांचे अनुभव होतात. या अनुभवात तार्‍यांशी संबंधीत, आत्मिक आयामांचा संबंध असतो. या चौथ्या पराचेतन अवस्थेत ज्यात जागृत, स्वप्न व गहन निद्रेच्या प्रति सजगता असुनही व्यक्ती या कुठल्याच अवस्थेते प्रभावित होत नाही. योगशास्त्रात यालाच तुर्यावस्था म्हणतात.
    तंत्रिका क्रियाविज्ञानाने मेंदूच्या या चौथ्या अवस्थेचा विद्युतीय अभ्यास केला. यात मेंदूचा मोठा भाग कॉर्टेक्स ज्याला साक्षी वा सजग मेंदू म्हणतात याची क्रियाशीलता वाढते. उच्च नियंत्रणाबरोबर मेंदूचे लिंबीक केंद्र जे भावनांचे केंद्र आहे त्याची क्रियाशीलता कमी होते. या अंतिम तुर्यावस्थेत जागृती, स्वप्न, सुषुप्तिच्या मधले सारे अवरोध मावळून जातात व चेतन, अचेतन मन एकाचवेळी प्रभावित होते. परिणामत: अद्वितीय आनंदमय व शांत व्यक्तित्त्व जन्माला येते. या अवस्थेला प्राप्त व्यक्तिला स्वप्ने पडत नाहीत. ते समत्वाच्या स्थितीला जातात. निद्रा वा जागणे हे सम होऊन जाते. कारण ते सतत तुर्येमध्येच राहतात. हा पहिला आध्यात्मिक स्तर आहे. आधुनिक मनोवैज्ञानिक कार्ल जुंग याने याला अचेतनाच्या आत प्रवेश असे म्हटले आहे. पॅरासाइकालॉजी, साई फिनोमेना तथा साइकोट्रॉनिक्स इ. वैज्ञानिक पद्धतीद्वारा हे प्रमाणित झालेले आहे की एकरस, एकसम अशी चिदानंद अवस्था एक सत्य आहे. ध्यानाद्वारा तीनही अवस्थांच्या मधील प्रतिबंध मावळून तुरीय अवस्था किंवा विश्‍वचेतनेचा क्रमश: साक्षात्कार होतो. प्रथम अज्ञात अचेतन मनाला प्रकाशीत करुन तुर्येचे दर्शन होते व मन पूर्ण रुपाने प्रकाशीत होते. हीच ज्ञानाची स्थिती आहे.
     जेथें सर्वचि नाहीं ठाईंचें। तेथें सर्वसाक्षत्व कैंचें । म्हणौनि शुद्ध ज्ञान तुर्येचें। मानूंचि नये ॥दास.5-6-8॥
    तुर्येची ही स्थिती सुद्धा द्वैताची स्थिती आहे. केवलाद्वैताची नव्हे. कारण मी आत्मा आहे हे कळाले. ज्ञाता व ज्ञान द्वैत शिल्लक राहतेच. द्रष्टा, दृश्य व दर्शन ही त्रिपुटी मिटली की तुर्येच्या पलिकडची स्थिती योग्याला प्राप्त होते. पण मी आत्मा आहे हे भान येणेही नसे थोडके !