Wednesday, June 29, 2016

जो श्रद्धचेनि संभोगे। सुखिया जाहला ॥ (मराठी)

जो श्रद्धचेनि संभोगे। सुखिया जाहला ॥

    तर्काच्या वादळानंतर बुद्धी, चित्त एका दिशेने व दशेने अनुप्राणित होतात, पेशीपेशीतून भावधारेची गंगोत्री उगम पावते, धो धो वाहु लागते, अनंताच्या समुद्राच्या दिशेने. तीचं सुरुवातीचं अवखळ ओसंडून वाहणं, समाधीच्या मैदानी प्रदेशात गंभीरत्व धारण करतं. पात्र विस्तारतं. त्या गंगोत्रीचं सुरुवातीचं एकटीचं गाणं आता वैश्‍विक सूर होतो. अशी श्रद्धारुपी गंगा मलिनता घालवते. आरपार निरसपाणी सौंदर्य उधळते. ती निष्ठेसारखी रविवारच्या चेहर्‍यासारखी नसते. तिथे मुखवटे नसतात. म्हणून अंध ही श्रद्धा नसते तर अंध हा विश्‍वास असतो.
    निष्ठा बाह्यसंस्कारामुळे मिळते तर श्रद्धा आत जन्माला येते. मन लेकाचं मोठ्ठं तार्किक आहे, संदेह करतं, पुरावा मागतं. होय म्हणायलाही मुद्दे शोधतं आणि विश्‍वास ठेवतं. पण विश्‍वास व संदेह एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. तर्क मात्र दोन्ही ठिकाणी केला जातो. श्रद्धा मात्र वेडेपणा असतो. ती एक व्यक्तिगत गहनतेत उमटलेली प्रतिती आहे. आई, बाप, समाज, संस्कृती, परंपरा यातून निष्ठा जन्माला येते. निष्ठा ही मृत श्रद्धा आहे. श्रद्धा ही जीवंत निष्ठा आहे !
    सर्व धर्म निष्ठेशी संबंधीत असतात पण धार्मिकतेचा संबंध केवळ श्रद्धेशी असतो. श्रद्धावान असणं म्हणजेच धार्मिक असणं.
    आस्तिकाची विश्‍वाला आलिंगन देणारी एक श्रद्धा असते तशी नास्तिकाचीही एक श्रद्धा असते. जगण्यासाठी मुळात श्रद्धा ही उपादान असते. ती प्रत्येकात असतेच. नाहीतर कोणी जगुच शकणार नाही. मग संदेही श्‍वास ही घेऊ शकणार नाही. पण तोही हवेवर श्रद्धा ठेऊन श्‍वास घेतोच. पूर्ण श्रद्धा परमजीवन ठरते, तर पूर्ण संदेह आत्महत्या !
    कधीतरी आकाशाला गवसणी घालता येईल या श्रद्धेने फांद्या वर उठतात, जीवनावरील त्या अनुकंपनीय श्रद्धेतूनच विकास संभवतो. श्रद्धावान सरळ असतो त्याची फसवणुकही होईल पण त्याला कोणी दु:खी करु शकत नाही. कारण तो अज्ञाताच्या वाटेवर निघालेला असुरक्षित जीवन जगणारा उपासक असतो. सुरक्षित निष्ठावान मानवी नियमांच्या कडीकोयंडांत स्वत:ला सुरक्षित करुन घेतात. बंदीस्त गुलाम. पण अनंताच्या अनिर्बंध स्वातंत्र्यात झोकला गेलेला श्रद्धावान वेडा पीर मोकळा असतो. हृदयाची कवाडं उघडी ठेऊन अस्तित्वाच्या प्रेमाचं स्वागत करतो. निष्ठा या मृत असतात हे समजतात तो गुलाम श्रद्धावान सम्राट बनतो. अमृत होतो !
    मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् । (गीता 8.7) माझ्या ठिकाणी मन-बुद्धी अर्पण केल्यामुळे तू नि:संशय मलाच मिळशील. हे सीमातीत अस्तिताचे आवाहन हृदय स्वीकारते. जन्मोजन्म मनबुद्धीने केलेल्या तर्काचे कधीतरी समर्पण होते. मग विठ्ठल भेटतो.
    कां वर्षाकाळी सरिता। जैसी चढो लागे पंडुसुता। तैसी नीच नवी भजतां। श्रद्धा दिसे॥(ज्ञा. 12-36) उन्हाळ्यात रोडावलेली सरिता पावसाळ्यात मात्र चांगलीच फुगु लागते. मेघही हातचं राखुन न ठेवता, सहस्त्रधारांनी सरितेला वर्षादान देतात. अगदी तसेच लडीवाळ भक्त बाळ श्रद्धेने माऊलीच्या पायाशी घुटमळतो ती माय लेकराला कडेवर घेते. भगवंतही त्या ढगांप्रमाणे पाझरतो. मग दोन्हीकडचे पाणी एकच होते. जे मेघात तेच सरितेत.
    जयांचा ईश्‍वरी जिव्हाळा। ते भोगिती स्वानंदसोहळा। जयांचा जनावेगळा। ठेवा आक्षै॥ (दा. 3-10-31) ही चढता वाढता भावोन्मत्तेत बुडालेला उन्मनी श्रद्धावान भक्त अमृताची चुळी मुखात धरतो. प्रेम पुष्ट होते, चित्त शुद्ध होते. तो प्राजक्ताचा भावसुगंधी सडा अंगणात पडतो. ईश्‍वरी जिव्हाळ्यातला स्वानंद सोहळामग्न भक्त गाऊ लागतो- रामदासी दर्शन जाले । आत्म्या विठ्ठलातें देखिले॥(स.गा.57)
    श्रद्धायुक्त हृदयात जे प्रतिबींब पडते. तेच त्याचे रुप होते. ज्याचे जया ध्यान। तेचि होय त्याचे मन॥(तुकाराम-3393). अशा श्रद्धेसाठी सुरुवात म्हणजे संदेहाचा ठावठिकाणा शोधुन काढून, बेगडी निष्ठा फेकून खरेखुरे प्रामाणिक संदेही बनुन मनाला तर्काच्या त्या सीमा रेषेवर आणुन ठेवणं, जिथे त्याचे विश्‍वास व संदेह मावळतील. कारण संदेह दु:खाशिवाय दुसरं काही देत नाही. पण त्या दु:खातुनच विकास संभवेल. श्रद्धा म्हणजे रुपांतरण, सार्‍या समाधीचा पाया श्रद्धा आहे असे पतंजलीही म्हणतात- श्रद्धावीर्यस्म्रतिसमाधिप्रज्ञापूर्वक इतरेषाम्॥पांतजलसूत्र1.20
    मनातील सर्वात शक्तिमान तत्त्व म्हणजे श्रद्धा, तीच चित्कला ! भगवंताची. आत्मस्थ स्पंदनशील प्रेमकंप बाह्यत: श्रद्धेचे प्राकट्य ठरते. सत्याच्या प्रकाशाची जीवाच्या ठिकाणचे सुप्तत्व ती सचेत करते. मूळ प्रकट करणे हा कलेचा धर्म असतो म्हणून श्रद्धा ही ब्रह्मकला आहे ! मानवी जीवनात प्रकट होणारी निसर्गदत्त रम्यस्थळी जी बीजं असतात ती कलेने अभिवृद्ध पावतात त्या मागे श्रद्धा असते. तुका म्हणे झरा। आहे मुळीचाचि खरा॥तुकाराम 2662
    श्रद्धावांल्लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय:। ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाऽधिगच्छति॥गीता4-39 इंद्रिय संयम असणार्‍या श्रद्धावान जीवाला ज्ञान प्राप्त होते, ते ज्ञान मिळतात तो शांती वा मोक्षास प्राप्त होतो. यात संयतेन्द्रिय: ची व्याख्या करताना आदी शंकराचार्य सूक्ष्म स्थिती सांगतात- श्रद्धावत्त्वेऽपि बहिर्मुखस्य ज्ञानं न सिद्ध्यत्यतस्तद्राहित्येन भवितव्यमित्याह संयतेन्द्रिय इति। अर्थात श्रद्धावान होण्याबरोबर अंतर्मुखता असेल तरच ज्ञान मिळते. तेव्हाच भक्ताचे श्रद्धेच्या द्वारातून चैतन्याच्या गाभार्‍यात प्रवेश होऊन शिवाचा परिचय होऊन तो ज्ञानवंत होतो. म्हणून ज्ञान हे भक्तिचे बालक आहे, पवित्र श्रद्धेच्या ईश्‍वरनिष्ठास ज्ञान सुखाने वरते असे माऊली म्हणते- यालागी सुमनु आणि शुद्धमति। जो अनिंदकु अनन्य गती। पै गा गौप्यही परी तयाप्रती। चावळिजे सुखे ॥ ज्ञा.9.40. या श्रद्धेला बाळसे आणते ती संतसंगती ! होईल माझी संती भाकिली करुणा। ते त्या नारायणा मनी बैसे॥ जाणीवमनापासून उतरत उतरत ही श्रद्धा परमजाणीवेत उतरते तेव्हा ती अविनाशी ठरते. सत्य व सरलता यांचा मिलाफ म्हणजे श्रद्धा ! ही प्राप्त होण्याला संतकृपाच लागते.
    जय हरी !
अक्षरसेवक लेखक- दामोदर प्रकाश रामदासी, पुणे.

No comments:

Post a Comment