Wednesday, January 10, 2018

मी भक्त तूं देव ऐसे करीं॥

मी भक्त तूं देव ऐसे करीं॥

    भक्तिमार्गात आंधळ्या प्रेमालाच श्रद्धा म्हणतात. कारण तिथे अज्ञातात झेप असते. इथे तर्काची शहाणी नजर नसते.
    संदेहाचा भयाण दुष्काळ सहन केल्यावर श्रद्धेच्या गडद काळ्या मेघातून तो काळा भगवंत कृपेच्या सहस्रधारांनी कोसळू लागतो, अकारण आनंदाचे चारी दिशांना इतस्तत: वाहत जाणार्‍या पाण्याचे गोड आवाज आसमंतातून येऊ लागतात. आणि बांध घालणाराच वाहून गेलेला असतो. समर्पणाचा तो सृजन सोहळा भक्ताच्या आंतर्सृष्टित रांत्रदिवस चालु असतो. ईश्‍वर मधुप्रेमाची अष्टसात्त्विक वीणा झंकारते, भक्तिचा पखवाजाचा नाद ही अनाहद होतो. रंध्रारंध्रातून संगीत पाझरतं, पाय अनासायास नृत्य करतात. त्या भक्ताच्या अस्तित्वातून एकच ध्वनी उमटत असतो- विठ्ठल ! विठ्ठल !
    जगन्नाथपुरीला चैतन्य प्रभु त्या निळ्या समुद्राची निळाई बघुन भावमग्न झाले व त्याकडे झेपावले. काली मातेच्या मूर्तीला फुलं वाहता वाहता ती स्वत:ला वाहणारे रामकृष्ण, तिचं नाव घेताच भावमग्न होतात, तिला आई म्हणत संवादही साधतात मग अद्वैतवादी तोतापुरी महाराजांना ते अज्ञान वाटते. भाववंतांची भावस्थिती त्या ज्ञानवंतांना समजणं अवघड जातं.
    पण हा भक्तिचा आनंदसोहळा सुरु होण्याआधी भक्ताची वेगळी स्थिती असते.
    सुफी संत बायजीद मशीदीत चिंतन करत असता खिडकीतून पक्षी मशीदीत प्रवेश करतो. बाहेर परत जाण्याचा दुसरा मार्ग न सापडल्यामुळे तो भिंतींना धडका मारत बसतो. त्याच्या गोंधळलेल्या स्थितीकडे बघताना बायजीद विचार करतो. आपलीही या पक्षासारखी स्थिती आहे. ज्यामार्गाने आलो तोच मुक्तिचा मार्ग आहे पण त्याच मार्गाने बंधनातही टाकले आहे असे वाटुन दुसरा मार्ग शोधत आपण संसारांच्या भिंतींना जन्मोजन्मी धडका मारत बसलो आहोत.
    जगात आगमनाचे द्वार प्रेम आहे. ते सांसारिक वासनेचे प्रेम उलटे झाले की भक्ति होते. प्रेमाच्या दिशेचे परिवर्तन भक्ति आहे.  हे उमगताच ठेचकळणारा मुमुक्षु भक्तीच्या दिशेने चालू लागतो.
    जिथे दोन आहेत आणि तरीही एकाची अनुभूति आहे तेव्हा योग होतो. पण जिथे एकच एकपण आहे तिथे दोघांतील योग संभव नाही. मिलनाची अट आहे ती म्हणजे तिथे दोघे हवेत. दोन वेगवेगळे अस्तित्व असतानाही एकत्वाचा अनुभव आला कि तो भक्तियोग होतो. किनारे दोन आहेत पण मधुन नदी मात्र एकच वाहत आहे अशी ही स्थिती आहे. वर वरचे द्वैत हवंये पण आंतर्स्थितीत अद्वैत आहे.        
    सगळ्यात विलक्षण गंमत म्हणजे या मिलनामध्ये तो भगवंतच आपल्यासाठी आतुर आहे, पण संदेह, अज्ञाताची भिती, अहं ती मिलनाची स्थिती येऊ देत नाही. बरं त्या परमात्म्याला वेळेची चिंता नाही. तो कालातीत आहे. तो बंद खिडकीबाहेर ताटकळत असलेल्या सूर्यकिरणांसारखा आहे. आपणच खिडकी उघडायची खोटी तो आत यायला आतुर आहेच. फक्त हवे अहंचे विसर्जन.
    मन जिथे संसाराला जोडलेले असते त्या जोडाला अहंकार म्हणतात तो जोड जाड भिंतीसारखा असतो जिथून सत्य दिसत नाही. तेच मन जिथे परमात्म्याला जोडलेले आहे त्या जोडाला अस्मिता म्हणतात. तिथला जोड काचेच्या भिंतीसारखा असतो. सत्य दर्शन होत असते पण मिलन नसते. सबीज समाधी. ती अस्मिता म्हणजे सूक्ष्म अहंकार. बुद्ध ज्याला आत्मा म्हणतात. म्हणून ते त्याला नाकारतात. कारण आत्मा-परमात्मा हे द्वैत राहतेच. पण भक्तिमार्गात एकाचवेळी द्वैत व अद्वैताचा चिद्विलास चालु असतो. तो तसा हवा असतो. किंबहुना त्या भक्तिची मिराशी घराण्यात परंपरेने आलेली आहे असेही संतांना म्हणताना आपण बघतो.
    आणि इये कृष्णमूर्तीची सवे। यालागी सोय धरिली जीवे। तंव नको म्हणौनि देवें। वारिलें मातें॥ज्ञा.-12-22 आणि मला तुमच्या सगुण कृष्णमूर्तीची सवय असल्यामुळे माझ्या मनाने तिचीच आवड घेतली, तोच देवा ! आपण तेथे प्रेम ठेवू नको असे बजावून माझा निषेध केला.
    जीवाचा जीवपणा राखुन ठेवून त्याच्या ठिकाणी आत्मवेदना व आत्मज्ञान खेळविण्याची लीला भगवत कृपेचाच भाग आहे.
    आत्मज्ञ भक्ताची एक आत्मवेदना असते. अद्वैतामुळे आत्मज्ञाची एकाकी अवस्था त्या भक्ताला बैचेन करते, आणि नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव। मी भक्त तूं देव ऐसें करीं॥ (तुकाराम 2278) अशी गोड भावपूर्ण प्रार्थना तो करु लागतो. आदी शंकराचार्यांचे स्मरण येते. वेदांतावर भाष्य करणारे परब्रह्म लिंगम्। भजे पांडुरंगम्॥ म्हणत गाऊ लागतात. तेव्हा ती आत्मवेदना आत्मनिवेदन झालेली असते. हेचि घडो मज जन्म जन्मांतरी । मागणे श्रीहरी नाहि दुजे॥ हीच ती आत्मज्ञ भक्ताची अवस्था.
    भक्तिजीवन हीच तत्त्वार्थियांची अभ्यर्थना होय. भगवंताने दाखवलेल्या सत्यरुपाच्या सोहळ्यापेक्षा भक्ताच्या स्वानुभुतिचा आनंद वरचढच आहे म्हणून विराट अनंत रुपाचा साक्षी झालेला अर्जुन जो दोन्ही सुखाचा ज्ञाता सावळ्या रुपातच सुखी आहे.
    पवित्र नद्यात पाण्याची खोली कोणी बघत नाही तर जिच्या दर्शनात, प्राशनात व स्पर्शांत पावित्र्याचा उल्हास असतो. तिच पवित्र नदी असेच आपण म्हणतो. तो विराट् दीर्घकाय असेलही पण सगुण दिव्यकाय आहे. त्याची गोडी वाटणं हा भक्ताचा स्वधर्म आहे. स्वभाव आहे.
    निर्गुण गुणिले गुण हा गुणाकार सगुण होय! सगुणत्वात ओतलेले समग्र निर्गुणत्व निर्गुणासह सगुण होते. स्वात्मविग्रहाची लीला तेथे वर्तत असते. सच्चिदानंदाचा विग्रह जर सगुण हाच असेल तर त्याची गोडी का न अनुभवावी ?
    सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण। ब्रह्म सनातन विठ्ठल हा॥ स्वसौंदर्याने कोटि काामदेवांना जो झांकतो त्या कृष्णच्या प्रितीसाठी आम्हाला कोणी गावंढळ वा सगुण वेडे म्हटले तरी पर्वा नाही !
जय हरि !

No comments:

Post a Comment