Tuesday, January 16, 2018

अखंड प्रसन्न राहण्याचा सराव करुयात !

अखंड प्रसन्न राहण्याचा सराव करुयात !

देखे अखंडित प्रसन्नता । आथी जेथे चित्ता। तेथे रिगणे नाही समस्ता। संसारदु:खा॥ज्ञाने.2-338॥

जेथे मन सतत प्रसन्न, प्रफुल्लीत आहे, उल्हसित आहे तेथे संसार दु:खांचा प्रवेश होत नाही.

    परात्पर सद्गुरु ज्ञानदेव बुद्धि स्थिर करण्याच्या युक्त्या सांगत असताना हा महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडतात. रोजच्या आयुष्याचा झगडा करणार्‍याला परमात्मा स्वप्नवत वाटू नये, प्रत्येक कृतीमध्ये त्याचाच दिव्य आविष्कार होत राहावा यासाठी बुद्धिची स्थिरता महत्त्वाची आहे. पण असंख्य वाटांनी मनाची धाव होत राहते. धावणे होते पण पोहोचणे होत नाही. देव मंदिरापुरता व आनंद कल्पनेपुरता मर्यादित राहतो. चेतनेला पंख लाभत नाही व आनंदाला पारखा जीव जन्मोजन्मी परमार्थाच्या दरीवर संसाररुपी वृक्षाच्या पारंब्याला अधांतरी लोंबकळत राहतो. ना धड प्रपंच ना धड परमार्थ ! अशी स्थिती होत राहते. पण आनंदमय जीवन जगणे हा त्या जीवाचा निसर्गदत्त हक्क व अधिकार आहे. अशावेळी विश्‍वाचे अयथार्थ दर्शन होत राहिल्याने दु:खी झालेल्या त्या जीवाला यथार्थतेच्या महामार्गावर आणत असताना सर्वप्रथम प्रसन्नतेचा अभ्यास करण्याची युक्ती सांगतात. प्रसन्नतेच्या या अभ्यासाने माणूस परमार्थातात अग्रेसर राहतोच पण प्रपंचातही नेटकेपणा मिळून करंटेपण सांडून जाते. प्रसन्न व हसरा माणूस हवाहवासा वाटतो. व्यवहारातही अशा कपाळावरील तणावाच्या रेषा पुसलेल्या माणसालाच यश मिळते. त्याची कल्पकता वृद्धिंगत राहते. म्हणून तर आनंदमय अभ्यासाची संकल्पना आज शाळेतही रुजवली जात आहे.
    मन:प्रसाद: सौम्यत्वं ...(मनाची प्रसन्नता, शांत भाव) या शब्दात सतराव्या अध्यायात भगवंत मनाचे तप सांगतात. प्रसन्नता हा चित्ताचा भाग व्हायला हवा असे म्हणतात. आनंद का ढगफुटीसारखा एकदम कोसळत नसतो तर क्षणाक्षणाला त्याचा अभ्यास करत बुद्धि स्थिर करावी लागते. प्रत्येक कृतीमध्ये ध्यानमयता, अपेक्षाभंगाच्या क्षणी खिलाडीवृत्ती दाखवणे, झालं गेलं विसरुन पुढे पुढे जात राहणे, उगाच वादात वेळ दवडण्यापेक्षा क्षमा करत जाणे, चेहर्‍यावर स्मित भाव असणे, नकारात्मक विचार व व्यक्तिंपासून दूर राहणे, मेंदूत अनावश्यक कचरा न भरणे इ. सरावाने हळूहळू ही प्रसन्नता वाढत जाते.
 एका साधूला विचांरले की तुमची साधना कोणती ? तर ते म्हणाले,"मी सदरा घालतानाही त्या कृती इतका आनंद कुठल्याच कृतीत नाही या भावनेने घालतो. प्रत्येक क्षणाला प्रत्येक कृतीत असेच जगतो हिच माझी साधना आहे.' हाच तो प्रसन्नतेचा अभ्यास !
    ज्याप्रमाणे निवार्‍यातील दिव्याची ज्योत मुळीच हालत नाही त्याप्रमाणे प्रसन्न चित्तामुळे स्थिर झालेला पुरुष आत्मस्वरुपाचे ठिकाणी जडलेला असतो. असे माऊली प्रसन्नतेची महती सांगतात. म्हणून प्रपंच व परमार्थात यशासाठी प्रसन्न रहो यारो ! जय हरि !

1 comment: