अपयश हे भाग्याचे लक्षणच आहे !
की निमित्ते कवणे येके। ते सिद्धि न वचना ठाके। परी तेथिचेनि अपरितोखे। क्षोभावे ना॥ज्ञाने.2-269॥-
काही कारणाने ते कर्म सिद्धीस न जाता तसेच राहिले तर त्याबद्दल मनात असंतोष मानून खिन्न होऊ नये, त्रासून जाऊ नये.
कारुण्यपुरुष ज्ञानदेवांची मॅनेजमेंट सूत्रे सामान्य जीवाला प्रेरीत व जागती ठेवतात. रोजच्या धकाधकीत पोटासाठी धावणार्या जीवाला वेगवेगळ्या युक्त्या सांगून त्याला यशाचा मार्ग दाखवत, त्याच्या आयुष्यात आनंद कसा प्राप्त होईल यासाठी सूक्ष्म युक्त्या शिकवतात. परमार्थ काय अन प्रपंच काय सगळाच Mind Game आहे. अपयश मिळताच त्या क्षणाला त्या जीवाची मानसिक स्थिती कशी आहे यावर पुढचे यश किती लवकर मिळेल हे अवलंबून असते. माणूस खचला तर यश लांबणीवर पडते. पण त्याच क्षणी उभारी मिळाली तर ध्येयाच्या दिशेने मन परत कामाला लागते. योग: कर्मसु कौशलम्। कर्माच्या त्या कुशलतेमध्ये, ध्यानमयतेमध्येच स्वत:शी योग जुळले जातात, स्वत:शी म्हणजेच परमात्म्याशी ! त्या योगात स्वत:विषयीचा, कार्याविषयीचा आदर वाढतो. माऊली फार मोठी गोष्ट सांगतात की यश जरी नाही मिळाले तरी कर्मामध्ये तल्लिन झालेले ध्यानमय चित्त ते कर्मरत राहते हेच मोठे यश मानावे. हिच Wining Situation आहे. कारण त्या चित्ताला त्यानिमित्ताने ध्यानमयतेचि स्थिती लाभत आहे. आचरता सिद्धी गेले। तरी काजाची कीर आले। परी ठेलियाही सगुण जहाले। ऐसेचि मानी॥ज्ञाने.2-270॥- आरंभिलेले कर्म शेवटास गेले तर उत्तमच पण संकटाने घेरले, अपुरे राहिले तरीही ते सफल झाले असे समज.
शर्यत अजुन संपली नाही कारण मी अजुन जिंकलो नाही ! ध्येयाच्या दिशेने उचललेले कुठेलेही पाऊल यशस्वीच असते असा स्वत:बाबत सकारात्मक विचार महत्त्वाचा आहे. स्थिर, प्रगल्भ माणूस यश व अपयश याबाबत आतून समत्वच राहतो. अपयशाच्या वार्याने खचून फडफडणार्या अंत:करणाचा तो नसतो. ज्या चुकांमुळे यश मिळत नाहीये त्या चुकांना शोधून अधिक कुशलतेमध्ये स्वत:ला तो नेतो यातच यशाचे गमक आहे. किंबहुना अपयश मिळणे हे एक प्रकारे भाग्यलक्षणच आहे. कारण नव्याने चेतना त्या लक्षावर केंद्रित होते, ध्यानमयतेच्या प्रक्रियेत त्याच्या मेंदूच्या अनेक सुप्त शक्ति जागृत होतात. नऊशेनव्व्याण्णव वेळा अपयशी झाल्यावरच हजारव्यांदा एडिसनचा दिवा पेटला होता. आणि ती घटना जगासाठी भाग्यकारक ठरली होती. म्हणून विश्वमाऊली निक्षूण सांगते- तू योगयुक्त होऊनि । फलाशासंग टाकूनि। मग अर्जुना चित्त देऊनि। करी कर्म॥2-267॥- हे अर्जुना ! तू निष्काम कर्म करणारा होऊन व ध्येय मिळेल न मिळेल याचा विचार न करता मन लावून कर्मे कर. चित्त देऊनि ! हा माऊलींचा शब्द आपण मंत्रासारखाच चित्तात धारण करायला हवा. जय हरि !
No comments:
Post a Comment