Sunday, November 4, 2018

वैराग्यापरते नाही भाग्य !

       राजा भर्तृहरी हा उज्जयनीचा राजा पत्नी पद्माक्षीसह राज्य करत होता. एकदा त्याला ब्राह्मणाने अपूर्व फळ दिले. त्या दिव्यतेचा, अमरतेचा लाभ पत्नीला व्हावा म्हणून तीला खायला दिले. पत्नीचे प्रेम राजावर नव्हते. तिने ते तिच्या प्रियकराला दिले, प्रियकराचे प्रेम राणीवर नव्हते तर ते नर्तकीवर होते, त्याने नर्तकीला फळ खायला दिले, गंमत अशी की नर्तकीचे प्रेम ब्राह्मणावर होते. तिने त्याला फळ दिले. ते फळ परत आपल्याला मिळालेले पाहून त्याने राजाला खुलासा विचारला तर राजाने फळाच्या प्रवासाचा शोध घेतला. दुखावलेल्या भर्तृहरीला त्यामुळे वैराग्य आले. धाकट्या भावाला राज्य देऊन तो रानात तपश्‍चर्येला गेला. पश्‍चात्ताप दग्ध राणीही त्याच्याबरोबर गेली. वाटेत तिला साप चावला. याचे अतीव दु:ख राजाला झाले कारण त्याचे मन अजुनही राणीतून निघालेले नव्हते. पण चर्पटीनाथ ऋषीने तिला जीवंत केले. तिचे पिंगला हे नाव पडले. पण ती पुढे मरण पावली. गोरक्षनाथांनी परत शंभर पिंगला निर्माण केल्या व भर्तृहरीला दाखवल्या. आयुष्याच्या क्षणभंगुरत्वाचे यथार्थ दर्शन झाल्याामुळे राजाचे वैराग्य अधिक दृढ झाले. ज्या ज्या गोष्टीत रस घेतला त्याचे यथार्थ रुप बघितले तर विरस वा वैराग्य निर्माण होईल.
      हा राजा भर्तृहरी म्हणतो अरे साधका ! वियोग दोन प्रकारचा आहे - अवश्यं याता रश्‍चिरत मुषित्वाऽपि विषया:। वियोगे को भेदस् त्यजति न जनो यत्स्वयम मून्॥ व्रजन्त: स्वातंत्र्याद तुलपरितापाय मनस:। स्वयं त्यक्ता ह्येते शमसुखमनंतं विदधति॥12॥ भर्तृहरी वैराग्यशतक॥ अर्थ- हे विषय मोठ्या संकटाने जरी मिळवले व खुप काळापर्यंत जरी जवळ राहिले तथापि कधी तरी ते आपणास सोडून जातातच. अर्थात आपणास त्यांचा वियोग होतो. आता हा वियोग दोन प्रकारचा. इंद्रिय शमामुळे, वैराग्य- संयमामुळे विषय सुटतात हा होणारा विषय वियोग पहिला व विषयच आपल्याला सोडून जातात हा दुसरा वियोग. आपल्या मनात नसताना विषय आपल्याला सोडतात हा वियोग संताप देणाराच आहे. त्यापेक्षा पहिला वियोग अत्यंत सुख देतो. यास्तव दुसरा वियोग होण्यापूर्वी पहिला आपण संपादावा.
    समर्थ याच महत्त्वाच्या विषयावर उपासकाला जागे करताना म्हणतात
म्हणौन विवेक आणि वैराग्य। तेचि जाणिचे महद्भाग्य। रामदास म्हणे योग्य । साधु जाणती॥20॥दासबोध॥
     विवेकाची पराकाष्ठा झाली की वैराग्य स्थिर होते. कारण परत ती बुद्धी माघारी फिरत नाही. मग त्या साधकाला या जगात काही धरावे वा काही सोडावे या दोन्हीही भावना होत नाहीत.
    मनुष्याची समग्र चेतना तीन छोट्या शब्दांभोवती फिरताना दिसते.- विवेक, बुद्धि व वृत्ति। विवेकाने श्रेष्ठ चेतनेचे लोक चालतात, बुद्धि ने मध्य चेतन स्तराचे लोक चालतात तर वृत्ति चेतनेची निम्नतम दशा आहे. म्हणून समर्थ विवेकाला महत्त्वाचे स्थान देतात. कारण त्यामुळे क्षणभंगुरता स्पष्ट कळते. मग नित्य काय आहे याचा शोध सुरु होतो.
    आद्य शंकराचार्य वैराग्याची व्याख्या करताना म्हणतात- तद्वैराग्यं जिहासा मा दर्शनश्रवणादिभिः । जुगुप्सा मा देहादिब्रह्मपर्यन्ते ह्यनित्ये भोगवस्तुनि ॥ विवेकचुडामणी21॥ अर्थ- अत्यंत सामान्य जीवजंतूंच्या देहापासून ब्रह्मदेवासारख्या सर्वोच्च अशा देहापर्यंत लाभणार्‍या सर्व नाशवंत सुखादी भोगवस्तूंविषयी ऐकून वा पाहून (विवेकामुळे) वाटणारा तिटकारा, त्याज्यबोध म्हणजेच वैराग्य होय. आचार्य म्हणतात की वैराग्य जसे विषयांपासून असते तसे ते स्वभाव व गुणांपासुनही असते.
ब्रह्मादिस्थावरान्तेषु वैराग्यं विषयेष्वनु। यथैव काकविष्ठायां वैराग्यं तद्धि निर्मलम्॥अपरोक्षानुभूति॥-काकविष्ठेप्रमाणे विषयसंसर्ग दूर सारुन ब्रह्मभावातच नित्य राहावे हेच खरे वैराग्य आहे.
    नित्य संसारातील क्षंणभंगुरता व दु:खाच्या अनुभवाने सामान्य जीवाच्या ठिकाणी हळूहळू या दु:खातून मोकळे होण्याची मुमुक्षा तयार होऊ लागते, त्याचा विवेक त्याला साथ देतो. वैराग्य म्हणजे राग वा दु:खाच्या जगतापासून वितृष्णा, फ्रस्ट्रेशन. प्रत्येक जीवाला प्रत्येक भोगानंतर एक पोकळी निर्माण झाल्याचा अनुभव येतो. कारण ऊर्जा बाहेर निघुन गेलेली असते. ऊर्जा जाताच एक विषाद, पश्‍चात्ताप निर्माण होतो. वैराग्य भाव तयार होतो. हा मनोवैज्ञानिक प्रवास रोजचाच आहे. एका स्त्री पासुन विरक्त होणे सामान्य घटना आहे पण एकुण स्त्री पासुन विरक्त होणे खुप असामान्य घटना आहे. आणि याच असामान्य घटनेकडील प्रवास तीव्र वैराग्य आहे. एका सुखाच्या व्यर्थतेमध्ये समस्त सुखांची व्यर्थता दिसून येणे, अशाप्रकारे एका सुखातील डिसइलूजनमेंट मध्ये समस्त सुखांची कामना क्षीण झाली तर जी आपली स्थिति बनते त्याचेच नाव वैराग्य आहे.
    वैराग्याचे क्षण रोजच येत राहतात पण ते धरुन ठेवणे त्याला शक्य होत नाही कारण पूर्वसंस्कार सतत प्रकृतीकडे खेचत राहतात. जिही आपणपे नाही देखिले। तेचि इहि इंद्रियार्थी रंजले। जैसे रंकु का आळुकैले। तुषांते सेवी॥ज्ञाने.5-110॥- ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेला दरिद्री माणुस कोंडा देखिल खातो. त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरुप सुखाचा अनुभव घेतला नाही, तेच इंद्रिय विषयसंबंधांपासून होणार्‍या विषयसुखात रंगलेले असतात.
    ज्याला दु:ख हवे आहे त्याने प्रकृतीचा ध्यास धरावा. जयास वाटे सीण व्हावा। तेणे विषयो चिंतीत जावा। विषयो न मिळता जीवा। तगबग सुटे॥ (दा.3-10-61) पण विवेकपूर्ण जीव सद्गुरुला प्रश्‍न करतो- देवासी वास्तव्य कोठे । तो मज कैसेनि भेटे। दु:खमूळ संसार तुटे। कोणेपरी स्वामी ॥ (दा.3-10-69)
    हा दु:खाचा अनुभव परत नको, अनंत आनंद कसा मिळेल याचा मार्ग दाखवण्यासाठी, ते वैराग्याचे क्षण धरुन ठेवण्यासाठी सद्गुरु वा भगवंत अभ्यास वा विधीला चिकटून राहायचा सल्ला देतात- अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते॥गीता6.35॥ श्रीमाऊलीही म्हणते- परि वैराग्याचेनि आधारे। जरि लाविले अभ्यासाचिए मोहरे। तरी केतुलेनि एक अवसरे। स्थिरावेल॥ज्ञाने.6.419॥ अशा अभ्यासाने गाठी म्हणजेच वासना. जशा गाठी बांधल्या त्याच्या विरोधी क्रियेनेच त्या सुटणार. सूत गुंतले ते उकलावे। तैसे मन उगवावे। मानत मानत घालावे । मूळाकडे॥दास.20-9-19॥ हळूहळू अभ्यासाने मनाच्या पार स्वत:चे दर्शन साधकाला होईल.
म्हणून त्या अनंताला दाखवणार्‍या वैराग्याला प्राणांमध्ये आत्मसात करण्याचा उपाय म्हणजे अभ्यास.
    अर्थात संसार नष्ट करणे ही वैराग्याची क्रिया नसून संसार - आत्मैव एतद् अशा स्वसंवेद्यतेने अनुभवणे हेच वैराग्य आहे. अवघाचि संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक॥
    शेवटी म्हणावेसे वाटते की वैराग्य म्हणजे आता असं काहीही माझ्यासाठी राहिलेलं नाही की ज्याच्यासाठी मी उद्या जगु इच्छितो ! हा महामृत्यूचा संकल्प म्हणजेच वैराग्य !

No comments:

Post a Comment