Saturday, June 25, 2016

समाधी साधन संजीवन नाम ! (मराठी)

समाधी साधन संजीवन नाम !
 

    समाधी साधन संजीवन नाम । शांति दया सम सर्वां भूती॥(ज्ञानेश्‍वर 400) पृथ्वी व पावसाचा सृजन सोहळा जो अनेक संभावनांना जन्म देणारा सृष्टीत घडत असताना जीव शिवाच्या एकत्वाचा वारी सोहळा अंतरंगात व बहिर्रंगात उपासनेला बहार आणतो. साधन व साध्यरुप संजीवन नाम परेत स्थिरावल्यामुळे उपासकाला जाले साधनाचे फळ। संसार झाला सुफळ॥ हे समाधान प्राप्त होते. उपासनेची नित्यनुतन यात्रा करणारा उपासक सद्गुरु कृपेने शांतिब्रह्म सिद्ध होतो किंबहुना सद्गुरुच त्या भूमिकेचे पसायदान देतात. असा कारुण्यमूर्ति सिद्धसमत्वाच्या अधिष्ठानावर स्थिर होतो.
    ओंकाररुप नाम हे गौणि भक्तिचेच दर्शन होय व गौणि भक्तिच्या प्रेमा उपासनेत समाधीच्या गहनतेत उपासक उतरतो. गौण्या तु समाधिसिद्धी:॥ एकूण नाम हे भगवंत साक्षात्कारापेक्षाही जास्त उपकारक व सामर्थ्यशाली आहे.
    नामाचिया सहस्रवरी। नावा इया अवधारी। सजूनियां संसारी। तारु जाहलों॥(ज्ञानेश्‍वरी अध्याय 12, 
ओवी क्र.90)
    ‘याच संसारी मी भक्तांचा तारक होऊन राहतो व माझ्या प्रत त्यांनी सहज यावे याकरीता अनंत नामांच्या नावा मी बांधल्या. एकाकी व एकटे हा भवसागर तरुन जाण्याकरता त्यांना धैर्य यावे म्हणून मी स्वत:च माझ्या सहस्रावधी नावाच्या नावा तयार केल्या आणि मूढ, जड, अपंग अशा माझ्या सर्व भक्तांना या नावात घालून पैलपार करु लागलो.’ असे साक्षात भगवंतच ग्वाही देतात.
    वेदांत प्रकट झालेले सर्व महावाक्यांचे उद्घोषही ओंकारस्वरुप हरी नामापुढे गौणच ठरतात, अशी गर्जना ज्ञानेश्‍वरांचा साक्षेप करतो- तत्त्वमस्यादि वाक्यउपदेश। नामाचा अर्धांश नाही तेथे॥ (ज्ञानेश्‍वर 431)
    कर्मयोग-यज्ञयागाला पुरोहित ब्राह्मण व्हावे लागते व त्यासाठीही भूमी, द्रव्य, कामनासिद्धी महत्त्वाची, बरे, योग साधण्यास जावे तर तर्काची खुंटी व चित्तभ्रष्टतेशी संयोग होण्याची भिती ! ज्ञानयुक्त मार्गावर साधनचतुष्टयसंपन्नता हवी पण चित्ताची अखंड चालणारी क्रीया, मर्कटलीला सुटत नाही अशी गत असताना- कलियुगामाजि एक हरीनाम साचे। मुखे उच्चारीता पर्वत छेदी पापांचे॥ (1071) असा निर्वाळा संत एकनाथ महाराज देतात. अर्थात कलियुग ही काळसापेक्ष नसुन चित्तसापेक्ष स्थिती आहे.
    चिंतन आसनी शयनी। भोजनी आणि गमनागमनी। सर्वकाळ निजध्यानी। चिंतन रामकृष्णाचे॥(1153, एकनाथ) असे संत एकनाथ महाराज सांगतात. पण या अनुसंधानात सूक्ष्मयुक्ती आहे.
    तस्य वाचक: प्रणव:॥ तज्जपस्तदर्थभावनम्॥ (पातंजलयोग 1.27,28) भगवान पंतजली नामविधी सांगताना उपासकाला युक्ती सांगतात की तो ॐकार प्रणव म्हणून विख्यात आहे. ॐकाराचा जप करा आणि त्यावर ध्यान करा. केवळ जप करा हे सांगत नसून जपावर ध्यान करायला सांगतात.
    नामाचा नाद आंतरबाह्य भरुन उरतो त्यावेळी मी त्या नादाला केवळ ऐकणारा आहे घेणारा नाही ही अकर्ताची भूमिका उपासनेत महत्त्वाची ठरते. नवा उपासक केवळ निरिक्षण करणारा साक्षी जर राहिला नाही तर येणारी मोहनिद्रा तो हमखास अनुभवतोच. ती निद्रा इंद्रिय मनाला शांतही करेल पण तुर्येची द्वारे ठोठावण्यास उपयोगाची नाही. नामाचा नाद झिंगुनही टाकेल पण अखंड सावधानतेशिवाय वा सजगते अभावी अशा नामाने पेंगुळलेपण येत राहते ! मन ही कुठली ठोस गोष्ट नसून सतत चालणारी प्रक्रियाच आहे.
    मनोविश्‍लेषक मनाचे स्तर सांगताना जागृत जाणीव (Conscious), अर्ध-जागृत जाणीव (Sub Conscious), अजागृत जाणीव वा नेणीव (Un Conscious) असे वर्णन करतात पण चौथा स्तर ज्याला परमजाणीव वा परमजागृती (Super Conscious) म्हणतात. त्याच्याविषयी मात्र आपले ऋषी व संतच बोलतात. सतत जागरुक वा सजगतेने नाम घेतल्यास पहिल्या तीन अवस्थांची माहिती उपासकाला होत असतानाच तो चौथ्या स्तरावर पोहोचतो. स्वत:चे जागेपण, निद्रापण व स्वप्न पाहताना मग तुर्येची दारं उघडली जातात. म्हणून केवळ जप केला गेला ध्यान न देता तर अर्धजागृतीत तो जातो, छान झोपही लागेल, तसाच मंत्र जपत राहिला तर नेणीवेतही उतरेल एक प्रकारचे झिंगलेपण येईल, मोहनिद्रा ग्रसित होईल. पण ते ध्यान नव्हे.
    नामाचा नाद इतका मधुर असतो की त्या नादात वैखरी, मध्यमा गुंतलेली आहे, उपासक सर्व संवेदनांच्या व अनुभवाप्रती सजग आहे अशावेळी शरीराला, मज्जासंस्थेला तो नाद शिथील करील पण उपासकाला नाही. ती जागृकताच, ते ध्यान परमजागृतीत घेऊन जाईल, पश्यंती, परेत. अनाहत प्रकटेल. ध्याता, ध्येयाची एकरुपताच ती अनुपमेय संजीवन अवस्था आहे, परमजागृतीची !
    सडे जे देखिले। ते ध्यानकासे लाविले। परिग्रही घातले तरियावरी॥(ज्ञा. अ. 12-91) हा क्रमश: होणारा प्रवेश माऊली सांगतात. सडे म्हणजे तो एकटा उपासक नामाच्या नावेत उत्साहापूर्वक, ध्यानमय अर्थात सजगतेने बसतो तेव्हा उपरोक्त वर्णीत मनाचे स्तर नामामुळे रंगतात व विगलीत मन, प्रक्षुब्ध चित्त, हतप्रभ प्रज्ञा व जडाश्रित अहंते पासून चेतना विलग होऊन धर्मप्रकाशात तो उपासक न्हाऊन जातो. हेच ते नामधारकाचे सप्रेम ध्यान होय. हे मधुकंपन आनंदाच्या निरवयतेकडे, प्रासादीकतेकडे नेऊन सायुज्यमंदिरात भगवंताशी अंत:संवेद्य मिलन करवते. सारे शरीर तटस्थ होऊन तो भावसमाधीत निमग्न होतो. मग वैश्‍विक संवेदना लाभलेला उपासक - काय नव्हे केले। एका चिंतीता विठ्ठले॥(तुकाराम 411) हे अनुभवाने गातो.
    ध्येयध्यान मनी उन्मनी साधनी। लाविता निशाणी ध्यानमार्गे॥ ते रुप साधन गुणागुणसंपन्न। ब्रह्म सनातन नांदे इटे॥ विठ्ठल नाम सार ऐसाचि निर्धार। मुक्तिपारावार ती अक्षरीं॥ निवृत्ती निवांत राहिला निश्‍चित। केलेसे मथीत पुंडलिकें॥ (निवृत्ती 19)
    सावळ्या परब्रह्माच्या रुप दर्शनाच्या ओढीने अष्टसात्त्विक भाव दशेमुळे सरल, सुशील, सद्धर्म्य, सानुरागकंपीत विरागी वारकर्‍याची चित्तदशा निवृत्तीनाथांचा साक्षेप प्रकट करते. वारीत नाचताना, गाताना शारीरमनोसंवेदनांच्या प्रती अतिसजग झालेला अंतर्मुखी, ध्यानमय नामौपासक वारकरी शरीराने भुवैकुंठ तर चेतनेने आंतरवैकुंठात सहजच उतरतो नव्हे नव्हे भगवंतच नामाच्या नावेतून त्याला सहज घेऊन जातात. उतरलो पार। सत्य झाला हा निर्धार॥ (तुकाराम 402) जय हरी !
-------------------------------------------------

वारी निमित्तानं अक्षरसेवा- दामोदर प्रकाश रामदासी, पुणे.
लेखक परिचय- सद्गुरु समर्थ रामदासस्वामींचे पट्टशिष्य योगीराज कल्याणस्वामी शिष्यपरंपरेत नवगणराजुरी (जिल्हा बीड, महाराष्ट्र) मठाचे महंत, भारतीय आध्यात्मिक विचार दर्शनाचे व्याख्याता, प्रवचनकार आहेत. 
यांचा स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरील ‘योद्धा संन्यासी’ हा सोलो प्ले प्रसिद्ध आहे.
नाटकाची क्लीप बघण्यासाठी- https://www.youtube.com/watch?v=FzDnzHTc11k

No comments:

Post a Comment