Wednesday, July 13, 2016

विरक्त जाला संसारी । या नाव मुमुक्षु॥ (मराठी)

विरक्त जाला संसारी । या नाव मुमुक्षु॥ (मराठी)
मुमुक्षे चे तीन स्तर


    आपण धावतो पुष्कळ पण पोहचत मात्र नाही. आयुष्याचा हिशेब मांडायला बसल्यावर संसाराच्या चारदोन काटक्यांशिवाय हाती काही लागत नाही. आतमध्ये खोलवर रिक्तता जाणवते आणि आयुष्याची संध्याकाळ म्हणजे पश्‍चात्ताप आणि.... भय इथले संपत नाही ही भयंकर अवस्था !
    या भवसागराच्या भोगतटावर युगानुयुगे शांतिसमाधानाची भीक मागत जीव उभा राहिला. आशा निराशेच्या द्वंद्वांची फसवणुक अव्याहतपणे भोगीत तो अभिलाषेने तिष्ठत होता ! भोगसुखाच्या ओलाव्याने अनेकदा शहारलाही, पण अंतरंगी शुष्कता अनुभवत गेला ! अनंत काळ ओसरला, पण शांतीची गुणगुण, सुखाची रुणझुण अनुभवली नाही आणि पश्‍चात्ताप वाटु लागला- जाला प्रपंची उदास। मने घेतला विषयत्रास। म्हणे आता पुरे सोस। संसारीचा॥दा. 5.8.4॥ असं कुठल्यातरी वळणावर वाटु लागतं. या भावनेनं त्याचं मन व चित्त संपृक्त होतं.
    समीपवर्ती विषयांशी तादात्म्य पावणारं, संस्कारबद्ध, स्मृतिमय, जड, वस्तुनिष्ठ असं मन हे वस्तुतंत्र आहे तर कोणत्याही काळी व स्थळी भावनिष्ठेशी एकरुप होणारं, वृत्तिविशेष असं चित्त हे द्रव्यतंत्र आहे.
    अशा त्या चित्तात दुसर्‍या किनार्‍याचं आकर्षण वाटु लागतं, बद्धतेच्या शृंखला मोडून मुक्त व्हायला ते आसुसतं आणि सुरु होतो प्रवास. त्या सत्यशोधक चित्तात सुरुवातीला असलेली कुतुहुलाची भावना संदेहमय असते. पण धक्केचपेटे सोसलेलं ते बिच्चारं या अज्ञाताच्या कृष्णविवरात उतरायला तयार होतं ही त्या अनंताचीच कृपा ! ते कधी भरकटतं, जिज्ञासेपोटी प्रश्‍नही विचारत बसतं.  पण अर्थात या कुतुहुलाने का कोठे तो भगवंत भेटतो.
    अर्थात पुढे वारीचे सातत्य सुरुच राहते. पावलं चालत राहतात. उन पाऊस झेलत, तीव्र जिज्ञासा थांबु देत नाही. बौद्धिक पांडित्य अंतर्ममनाचा गाभा व्यापेलही पण तेवढ्याने भागणार नाही. जो पर्यंत तो वारकरी उपासक मस्तकाशी संबंधीत आहे तो पर्यंत विठ्ठल दूरच. पण सद्गुरुकृपेनं चालणं काही थांबत नाही. मग शेवटी परेच्या गहनतेत चेतना उतरते, विठ्ठल जीवनमरणाचा प्रश्‍न होऊन जातो. विठ्ठलाला उपासक ‘संपूर्ण’ हवा असतो. केवळ डोक्याने नाही तर हृदयासकट.
    मस्तकातून हृदयात उतरणारा तो बद्ध मुमुक्षु उपासक होतो. अनासक्त व्हायची तीव्र भावना म्हणजे मुमुक्षा ! संसारचक्रातून सुटण्याची धडपड म्हणजे मुमुक्षा ! पण यातही सुरुवातीला उपासनेमध्ये एकतृतीयांश शक्ति तो पणाला लावतो कारण जुने संस्कार मागे ओढत राहतात. काहीसं यश पदरी पडलं असं वाटतं. असा उपासक अस्वस्थ नसतो पण शांतही नसतो. संसारापासून सुटलेला पण परमार्थ न गवसलेला अशी सैराट अवस्था असते ! सत्प्रवृत्त पण निस्तेज ! काटे गळुन पडलेले आहेत पण फुलं उमलली नाहीत अशी ही चिडचिडी अवस्था मिळालेला, त्याच्याकडे पाहिल्यावर त्यानं काहीतरी मिळवलेलं आहे हे जाणवतं पण तरीही काहीतरी कमी आहे असं वाटत राहतं. यांच्या सान्निध्यात, हे आपल्यावर चिडणार नाहीत पण क्षमाही करणार नाहीत. ते आपल्याला शोषून घेतील. अनेक संन्याशांबाबत हे अनुभवायला येतं. या इयत्तेतल्या तिबेटी लामाला गावात फिरकु देत नाहीत. हिमालयात हिंदु संन्यासालाही झाडाला हातही लावु देत नाहीत. कारण यांच्या स्पर्शानं झाडं मरतात. अशा लामा व संन्याशांसाठी एकांतातले वेगळे मठ असतात. एखाद्या बेटासारखे एकांडे या उपासकांची मोक्षाची इच्छा मृदु असते असं पतंजली म्हणतात. मृदुमध्याधिमात्रत्वात्ततोऽपि विशेष:॥ समाधीपाद 1.22 ॥ अर्थात मृदु, मध्य व तीव्र या तीन अवस्था आहेत.
    पण त्या वारीत संत समागम त्याला प्रेरीत ठेवतो. मार्ग दाखवतो. संतांचे संगती मनोमार्ग गती। (ज्ञानेश्‍वर 744. हरिपाठ) आणि         वारी पुढे चालुच राहते. मग उपासनेमध्ये दोन तृतीयांश शक्ती लावणारा मुमुक्षु उपासक थोडी भर पडल्यासारखा पर्वतशिखरासारखा शांत होतो. चंचल मनोदशा स्थिर होते. त्याच्या सान्निध्यात ती शांती आपल्यालाही वेढुन टाकते. बागेत गेल्यावर फुलांचा सुगंध येतो तसं होतं. तो वाळवंटातून हिरवळीवर आल्यासारखा असतो आणि हे अक्षरश: जाणवतं. पण निगुढ शांतीही अवगुंठनासारखीच असते. तिथे सळसळता उत्सव नसतो, चिद्विलास नसतो ! पतंजली याला मध्य मुमुक्षा म्हणतात. पण ती शांतीही आता परमानंदमय पंढरपूर इथे जवळच कुठेतरी असल्याचं द्योतक ठरते.
    पण मुमुक्षेच्या शेवटच्या स्थित्यंतरात सर्वस्व ओतले जाते. वारीच्या वाटेवरला ‘धावा’ आता तीव्र होतो. या धुंदीनं आपोआप नर्तन असलेलं कीर्तन सुरु होतं, वेडपीसं ! आत चंद्रभागा ओसंडून वाहु लागते व तो त्यात तो सुस्नात होतो. या आनंदाची चिन्ह म्हणजे भक्तिरुपी गोपीचंदनाचा टीळा आणि वैराग्यरुपी बुक्का त्याच्या भाळी लागतो. या आनंदाचं वर्णन करावं तरी कसं?
    एकादशीला एकच दशा लाभलेला भक्त विठ्ठलाच्या पूर्वेकडील महाद्वारात उभा आहे, दर्शन करुन पश्‍चिम द्वाराने त्याला बाहेर पडायचं आहे. सद्गुरु त्याला पश्‍चिम द्वाराकडे अर्थात निर्गुणतेकडे नेत आहेत. पश्‍चिमेंचे जे क्षितीज आहे ते हृदय आहे. चित्कला जगदंबा कुंडलिनी हृदयचक्रात येताच आपला अहं असलेला स्वरुपभाव अस्ताला नेते व तिथे तिचे स्वरुप भक्तवर मारुति ‘विरलोदय भाव’ या संज्ञेला प्राप्त होते. म्हणून मारुति तत्त्व भक्तिच्या प्रदेशात महनीय आहे.
    समर्पणाचा भाव ही जिथे समर्पित होतो अशी एकच दशा म्हणजे एकादशी ! या एकादशीला ती ‘मारुती’ दशा प्राप्त होण्यासाठी महाद्वारात आता उभा असलेल्या भक्ताला पश्‍चिमद्वाराकडे जाताना मध्ये पितांबर परिधान केलेले, कटीवर हात व ज्यांचे कोमल नेत्रद्वय चरणांकडे झुकलेले आहेत, कारण तो भक्त सर्वभाव वा अगदी शेवटचा राहिलेला सूक्ष्म अहंकार, अस्मिता, वा परत परत जन्माला घालणारी बीजे, त्या पायांपाशीच समर्पित करतो, त्या भक्ताच्या सबीज समाधीचे हे कौतुक पाहणारे भगवान विठ्ठल त्याला भेटतात. तो सावळा सगुण परमात्मा भक्ताला पश्‍चिमेकडे जाण्याआधी मध्येच अडवतो आणि प्रेमाच्या गोष्टी दोघांत सुरु होतात.
    खरं तर तो पश्‍चिम द्वारीचाच निर्गुण परमात्मा अखंड वारीरुपी तपश्‍चर्या करुन आलेल्या, थकलेल्या भक्ताला आलिंगण्यास सगुणरुपात धावत धावत येतो. तोपर्यंत भक्तही गाभार्‍यापर्यंत पोहोचलेला आहेच. त्या राउळात भक्ताला भगवंत कवटाळतो. हेच ते भगवान विठ्ठलाचे राउळ अर्थात भक्ताच्या हृदयातील सगुण दर्शन होय ! बरं या भगवंताला हे असं कवटाळल्याशिवाय पश्‍चिमद्वारांवर जाता येत नाही ! कारण ते द्वार पिछाडीला आहे.
    हे समस्तही श्रीवासुदेवो। ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो। म्हणौनि भक्तांमाजी रावो। आणि ज्ञानिया तोचि॥ज्ञा.7.136॥ हा एकात्म, सोलीव सुखाचा लाभ झालेला उपासक गाऊ लागतो- सोलीव ते सुख अति सुखाहुनी। उभे ते अंगणी वैष्णवांच्या॥तुकाराम 323॥
    सद्गुरु हा सर्व सोहळा पार पडेपर्यंत तिथे असतातच.
      मग उपासक अभक्त होऊ शकत नाही असा भक्त होतो. तो भक्त म्हणजे विश्‍वाचा प्रसन्न प्रभव ! तो भक्त म्हणजे विश्‍वप्रेमाचा सजीव साक्षात्कार ! त्या राऊळात त्याची वारी सुफल संपूर्ण जाहली !
जय हरी विठ्ठल !
लेखक - दामोदर प्र. रामदासी

No comments:

Post a Comment