Friday, August 5, 2016

तरी मातेंचि गा पावसी। हे माझी भाक ॥ समर्पणाची कसोटी व कर्मसंन्यास (मराठी)

तरी मातेंचि गा पावसी। हे माझी भाक ॥
समर्पणाची कसोटी व कर्मसंन्यास (मराठी)

    आत्मदानाची दिव्यता म्हणजे समर्पण भाव. समर्पण म्हणजे भगवंताप्रति असलेली सर्वोच्च अविचल स्थिती. समृद्ध प्रगतियान. यतोऽअभ्युदय नि:श्रेयस सिद्धी स धर्म:॥ अभ्युदय अर्थात प्रापंचिक व नि:श्रेयस अर्थात पारमार्थिक सर्वोच्च लब्धता म्हणजे धर्म पण या पुरुषार्थासाठीही हवी पूर्ण समर्पणाची चित्तस्थिती. समर्पणाच्या भावना जीवनास लक्ष्याकार करतात. लक्ष्य व वेध घेणारा दोघांनाही दिव्यता देतात. हेच भगवंताप्रति असलेले भागवत आत्मनिवेदन वा अव्यभिचारी प्रेम होय. वेद ज्यास यज्ञ म्हणतात त्यास अध्यात्मात भक्ति म्हणतात, समर्पण शब्दात वरील सर्व भाव अनुस्युत होतात. अर्थात यज्ञ प्रवृत्तीत अभिलाषा डोकावते हा विचार अलाहिदा ! जे भक्तिंत वा समर्पणात नसते.
    मय्यर्पित मनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्॥गीता 8.7॥- अर्थात माझ्याच ठिकाणी मन व बुद्धी अर्पिली आहेत असा तू मलाच प्राप्त होशील यात संशय नाही.
    तू मन बुद्धि साचेसीं। जरी माझिया स्वरूपी अर्पिसी। तरी मातेंचि गा पावसी। हे माझी भाक॥- माऊली म्हणते- हे अर्जुना, तू मन आणि बुद्धी ही खरोखर माझ्या स्वरुपात अर्पण करशील तर मग माझेच रुप होशील हे प्रतिज्ञापूर्वक तुला मी सांगतो.
    यात भगवंताने वापरलेला प्रतिज्ञापूर्वक हा शब्द सृष्टीचा सनातन नियम आहे. सिद्धांतरुप आहे. त्यामुळे या समर्पित होण्याच्या भावदशेला आपोआपच महनीयत्व प्राप्त होते.
    यत्करोषि यदश्‍नाचि यज्जुहोषि ददासि यत्। यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्॥ गीता 9.27॥ अर्थात घडणार्‍या प्रत्येक क्रियेत ईश्‍वरार्थ धारणा ठेवणे हा समर्पणाचा प्रथम पाठ होतो. कारण ज्याप्रति समर्पित व्हायचे ती गोष्टही व्यापक व पूर्ण हवी. अपुर्‍या पदार्थांप्रति समर्पित होणे म्हणजे तसेच गुणसमुच्चय समर्पित होणार्‍या चित्तात प्रकट झाले म्हणून समजावे.
    म्हणून समर्पित होताना काय चित्त दशा हवी ? तर 1) जसा मी देवास हवा होतो तसेच त्याने मला घडवले व तेवढेच त्याने मला दिले 2) जे दिले तेही त्याच्यासाठीच व त्याने माझे सामर्थ्य पाहुन मला दिले, ते देणे किती असावे हे मी ठरवु नये वा तशी वासना करु नये व दिलेले ते मी त्याच्यासाठीच वापरायचे आहे. 3) जसा फुलास सुगंध, वार्‍यात वाहणे दिले तसे. तेव्हा त्या फुलाने वारा होणे वा वार्‍याने फुल होण्याचा हट्ट करु नये. कारण तसा हट्ट हा त्या देवाने जे दिले त्याप्रति अप्रसन्न होण्यासारखे आहे अशा चित्तात समर्पण ढासळले असे समजावे. आपापल्या दिलेल्या शक्तिने समर्पित होणे हेच प्रसन्नतेचे रहस्य आहे.
    4) म्हणून स्वत:प्रति अज्ञानाचा वा कमीपणाचा वा अपराधीवृत्तीचा गंड हा पारमार्थिक गुन्हा आहे. कर्मवृत्तिचा त्याग वा निवृत्ती हे ढोंग होऊन बसते कारण तसे करणे म्हणजे देवाने जे माझ्यासाठी नेमून दिले त्याप्रति नाखुष असणे आहे वा त्या कर्मांच्या माध्यमातून देवाला माझा समर्पणाचा भाव हवा होता त्याला मीच खोडा घातल्यासारखा होईल. म्हणून जे माझ्याकडुन कर्म होते आहे ते माझ्यामार्फत तोच करतो आहे व ते त्यालाच समर्पित होते आहे हा भावच ईशपूजा आहे. 5) म्हणुन त्या सर्व कर्मांच्या बाबतीत अखंड प्रसन्नभाव व उत्साह हा चित्ताच्या ठिकाणी चोवीस तास राहिला असेल तर देव माझ्यावर खुश आहे असे समजावे.
    बाह्य कर्मांबरोबर मन (संकल्प व भोग), चित्त (आस्था), बुद्धी (स्मृति व गति) व अहंकार (अभिमान व अस्मिता) या सर्व अंतरीय शक्ति ईश्‍वरार्थ वापरणे हे स्वाभाविकच आले.
    ठेविले अनंते तैसेचि राहावे। चित्ती असु द्यावे समाधान ॥तुकाराम॥ यात ठेविले या संकल्पनेतील गहनता चिंतनीय होऊन जाते.
    जगाच्या खेळात नेमून दिलेले काम इतरांच्या सहयोगाने करावे लागते तेव्हा एखाद्याने त्या खेळात ते काम टाळले तर खेळातील आनंद संपून जातो. त्यांना आनंदही हवा आहे पण कामही नको आहे. असे खेळाडु खेळ मोडतात वा खेळ टाकुन वेगळे होतात. या जीवांना तथाकथित कर्मसंन्यासी जाणावे. यांना आनंदाची वासना आहे पण खेळ नकोय. एक प्रकारे देवनिर्मित खेळातील हा अपराधी ठरतो कारण त्या खेळाला त्याने खोटे मानलेले असते.
    माऊली देह असे पर्यंत कर्मत्याग अशक्य आहे असे ठणकाऊन सांगतात- तैसा शरीराचेनि आभासे। नांदतु जव असे। तव कर्मत्यागाचे पिसे। काइसे तरी॥ज्ञा.18.222॥ व या पाच कारणांमुळे कर्म घडते असे ते सांगतात- 1) देह- तैसी यथा लक्षणे। आइके कर्मकारणे। तरी देह हे मी म्हणे। पहिले एथ॥18.315॥, 2) कर्ताजीव- आणि कर्ता हे दुजे। कर्माचे कारण जाणिजे। प्रतिबिंब म्हणिजे। चैतन्याचे जे ॥18.321॥, विभिन्नइंद्रिये- ते पृथक्विधकरण। कर्माचे इया कारण। तिसरे गा जाण। नृपनंदना॥18.331॥, कर्तृत्वशक्ति- तैसी क्रियाशक्ति पवनी। असे जे अनपायिनी। ते पडिली नानास्थानी। नाना होय॥ ते भेदिली वृत्तिपंथे। वायुशक्ति गा एथे। कर्मकारण चौथे। ऐसे जाण॥18.333/343॥ व दैव-देवांचा समुदाय- ते देववृंद बरवे। कर्मकारण पांचवे। अर्जुना एथ जाणावे। देवो म्हणे॥18.351॥. कर्मसंन्यास तोच ज्यात अहंकार रहित ईश्‍वरार्पण वा सद्गुरुर्पण भाव आहे.
    अहं-बुद्धि-चित्ताप्रति नकारात्मक भाव सोडुन त्यांना ईश्‍वराप्रती जडवुन ठेवणे व जे जे माझ्याकडुन होईल ते सर्व त्यास अर्पण आहे हा भावच कर्मसंन्यास होय. परि तोचि संन्यासु वीरा। करणीयेचा झणे करा। आत्मविवेकु धरा। चित्तवृत्ति हे॥ज्ञा.18.1261॥ ऐसे चैत्य जाते सांडिले। चित्त माझ्या ठायी जडले। ठाके तैसे वहिले। सर्वथा करी॥ज्ञा.18.1268॥
    स्वामी विवेकानंद म्हणतात हे जग म्हणजे एक शाळेच्या खेळाचं मैदान आहे व आपण शाळकरी पोरं त्या मैदानावर खेळण्यासाठी सोडलेली आहोत. ही बुद्धी आल्यावर या जगात हसण्याशिवाय, खेळाडुवृत्तीशिवाय काही शिल्लक राहत नाही. असं असताना आपल्यातून खेळणाराही तोच, खेळही तोच होतो. त्यामुळे धरुन ठेवावं असं काही राहत नाही. हा खेळच चिद्विलास आहे.
    भोगविषयांवरील आसक्तिभावनेपेक्षा प्रेमाची भावना महत्त्वाची. भोगही तोच. अहं भावनेप्रति अपराधभाव धरण्यापेक्षा त्याला व्यापक स्वरुप देणं अगत्याच होतं. लोभही त्याचा, दंभही तोच, मोहातला मोहनही तोच अशावेळी षड्विकार ही विकाराची भावना जाऊन षडभावयुक्त असा मी तोच आहे असे व्यापकत्व येते. या धारणेमुळे आत्मगंडयुक्त चित्ताची विपन्नावस्था नाहीशी होते. ईश्‍वरीय प्रेमाची अद्वितीय भावनाच ऋजुता आहे ! ती प्रकट होते. त्या व्यापक अहंतेमध्ये त्या भगवंताचे अवतरण होते.
    भक्तिगंगेच्या तिरावर आलेला शरणागत उपासक सद्गुरुंच्या साक्षीने त्या गंगेच्या प्रवाहावाबरोबर स्वत:ला सोडून देतो. या समर्पणाला बुद्ध स्रोतापन्न होणं म्हणतात. अर्थात हे समुद्राच्या आकांक्षेने नसते तर ते वाहणंच लक्ष असते. आता कुठे पोहोचण्यासाठी हे तरंगत वाहणे नसते.
    शरणागत भाव मंदिराचा अत्युच्च कळस म्हणजे समर्पणता ! अर्थात त्यात समत्व भावनेने अर्पण होणे हा भाव अंतर्भुत असतोच. आता सुखदु:खाच्या भावनीक आवाहनाला उपासक भगवंताप्रति समर्पित करत राहतो. कारण योगभ्रष्टतेची आत्मपीडा त्याला मिटवायची असते. त्याची ही भोगभावनेप्रति उपेक्षा शुष्क नसते तर समर्पित असल्याने उत्साहमय असते. ऐलतीरावरील भोगमय अभ्युदयाचा सुखसोहळा अनुभवल्यावर आलेला तो वीतराग असतो. त्याला पैलतीरावरचा अकारण आनंदसोहळ्याचा वैकुंठ खुणावत असतो. त्याला त्या भोगाविषयी आसक्तीही नसते वा क्रोधही नसतो, यालाच कृष्ण अनासक्त योग म्हणतात.
    त्या उपासकाचे अंधाराशी भांडण मिटलेले असते कारण तो प्रकाशाचा पांथस्थ झालेला असतो. अर्थात तो अंधार आहे ही व्याख्याही आता त्याच्या चित्तात उमटत नसते ! कारण ईश्‍वरप्रेमातच तो क्षणाक्षणाला उगवत राहतो. असे अंतरीचे रसार्जन दिव्य आहे.
    श्रीकृष्णार्पणमस्तु !
लेखकु - दामोदर प्र. रामदासी

No comments:

Post a Comment