Thursday, January 18, 2018

स्वत:च्या दिव्य अस्तित्वाचा स्वीकार

स्वत:च्या दिव्य अस्तित्वाचा स्वीकार
 
का पूर्ण कुंभ उलंडला। तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला। परी भानु नाही नासला। तयासवे॥ज्ञाने.2-41॥

पाण्याने भरलेले भांडे पालथे केल्यावर त्यातील सूर्यप्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते; परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर खरा सूर्य मात्र नाश पावलेला नसतो.

न जायते म्रियते वा कदाचिन्
नायं भूत्वा भविता वा न भूय:।
अजो नित्य: शाश्‍वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे॥20॥
वेदाविनाशिनं नित्यं य एन मज मव्ययम्
कथं स पुरुषं पार्थकं घातयति हन्ति कम्॥21॥

    प्रत्येक जीवाचे दिव्यत्व कधी न संपणारे आहे, चेतना नित्य, सनातन, न बदलणारी, अजन्मा, अमृत अशी आहे. गीतेतील दुसर्‍या अध्यायाच्या 20 आणि 21 व्या श्‍लोकावर टिका करताना, सिद्धांत समजावून सांगताना ज्ञानदेव हा दृष्टांत सांगतात.
    स्वत:च्या दिव्यत्वाचा अनुभव म्हणजेच उगमस्थानाकडे अर्थात वारकर्‍याचे विठ्ठलाच्या राउळात पोहोचणे होय. भक्तिच्या नादात व भावमग्न नृत्यात दिब्यत्व जागते. प्रत्येकजण प्रेमळ माऊली होतो. म्हणून प्रत्येक विनम्र, प्रेमळ वारकरी स्वत:हून माऊली माऊली म्हणत, एकमेकांचे दर्शन करतात. दिव्यत्व ठायी ठायी दिसू लागते. स्वत:च्या दिव्यत्वाच्या दिशेने केलेला हा आनंदमय प्रवासच पंढरीची वारी आहे. ‘स्व’ मताबाबत कट्टरपणा, अविवेकवाद जिथे जगात वाढताना दिसत आहे जसा मी दिव्य आहे तसा प्रत्येकजण दिव्यच आहे अशा संस्कारांचे, सूत्रांचे बालमनावर रोपण करणे आज काळाची गरज आहे. ज्याला स्वत:विषयी आदर आहे त्यालाच दुसर्‍याविषयी आदर असु शकतो. माझ्यासारखेच सगळे आहेत. हा समानता, बंधुत्वाचा संभावित विचार मेंदूच्या पेशींवर कोरला गेला तर जात, पंथ, प्रांताचा अहंम् मावळल्याशिवाय राहणार नाही. हा आंतरमनावर उमटलेला ठसा कार्यातही प्रतिबिंबीत होइल. ते कार्यही दिव्य होईल. कुशलतम् कार्य सर्व स्तरावर उंची वाढवेल. प्रगतिपूरक ठरेल. एखादी व्यक्ति ‘वारकरी’ होण्याची हीच प्रक्रिया आहे.
    आयुष्याच्या वाटचालीत पराभवाचे क्षण आल्यावर हत्या वा आत्महत्येचा नकारात्मक विचार शिवलेल्या, त्या खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी ही ओवी मंत्रासमान आहे. मी नाहिसा होईन वा मी कोणाला नाहिसा करेन असे म्हटल्याने काय चैतन्य नाहिसे होते ? विज्ञानाचा सिद्धांत आहे, जगात काही जन्मतही नाही वा नाहिसेही होत नाही केवळ रुपांतरीत होते. निसर्गाचा हा सनातन सिद्धांत आहे.
    उपनिषद काळातील ऋषी प्रथम मानवाच्या दिव्यत्वाची उद्घोषणा करताना दिसतात- श्रृण्वन्तु विश्‍वे अमृतस्यपुत्रा आ ये धामानि दिव्यानि तस्यु:। वेदाहमेतं पुरुषं महान्तमादित्यवर्णं तमस: परस्तात्॥श्‍वेताश्‍वेतर उपनिषद -2.5 व 3.8॥ मानवाला अमृताचे पुत्र (दिव्यत्वाचे अंश) म्हणून सन्मान देणारा हा भारतीय विचार यामुळेच जगात एकमेवद्वितीय ठरतो.
    स्वामी विवेकानंदांचे वाक्य आठवते. हे वाक्य मेंदूची भाषा व्हायला हवे. स्वामीजी म्हणतात-‘ईश्‍वराचे पुत्र तुम्ही ! तुम्ही अमृताचे अधिकारी, पवित्र, पूर्ण. तुम्ही या मर्त्यभूमीवरील देवता. तुम्ही पापी ? अशक्य ! मानवाला पापी म्हणणेच महापाप. विशुद्ध मानव आत्म्यावर तो मिथ्या कलंकारोप मात्र आहे. बंधुंनो ! तुम्ही सिंहस्वरुप असूनही स्वत:ला मेषतुल्य का समजता ? उठा मृगराजांनो उठा, आणि आपण मेंढरे आहोत हा वृथा भ्रम झाडून टाका. तुम्ही जरामरणरहित, मुक्त आणि नित्यानंदस्वरुप आत्मा आहा.’
हरि ॐ तत् सत्

Tuesday, January 16, 2018

अपयश हे भाग्याचे लक्षणच आहे !

अपयश हे भाग्याचे लक्षणच आहे !
 
    की निमित्ते कवणे येके। ते सिद्धि न वचना ठाके। परी तेथिचेनि अपरितोखे। क्षोभावे ना॥ज्ञाने.2-269॥-

काही कारणाने ते कर्म सिद्धीस न जाता तसेच राहिले तर त्याबद्दल मनात असंतोष मानून खिन्न होऊ नये, त्रासून जाऊ नये.

    कारुण्यपुरुष ज्ञानदेवांची मॅनेजमेंट सूत्रे सामान्य जीवाला प्रेरीत व जागती ठेवतात. रोजच्या धकाधकीत पोटासाठी धावणार्‍या जीवाला वेगवेगळ्या युक्त्या सांगून त्याला यशाचा मार्ग दाखवत, त्याच्या आयुष्यात आनंद कसा प्राप्त होईल यासाठी सूक्ष्म युक्त्या शिकवतात. परमार्थ काय अन प्रपंच काय सगळाच Mind Game आहे. अपयश मिळताच त्या क्षणाला त्या जीवाची मानसिक स्थिती कशी आहे यावर पुढचे यश किती लवकर मिळेल हे अवलंबून असते. माणूस खचला तर यश लांबणीवर पडते. पण त्याच क्षणी उभारी मिळाली तर ध्येयाच्या दिशेने मन परत कामाला लागते. योग: कर्मसु कौशलम्। कर्माच्या त्या कुशलतेमध्ये, ध्यानमयतेमध्येच स्वत:शी योग जुळले जातात, स्वत:शी म्हणजेच परमात्म्याशी ! त्या योगात स्वत:विषयीचा, कार्याविषयीचा आदर वाढतो. माऊली फार मोठी गोष्ट सांगतात की यश जरी नाही मिळाले तरी कर्मामध्ये तल्लिन झालेले ध्यानमय चित्त ते कर्मरत राहते हेच मोठे यश मानावे. हिच Wining Situation आहे. कारण त्या चित्ताला त्यानिमित्ताने ध्यानमयतेचि स्थिती लाभत आहे. आचरता सिद्धी गेले। तरी काजाची कीर आले। परी ठेलियाही सगुण जहाले। ऐसेचि मानी॥ज्ञाने.2-270॥- आरंभिलेले कर्म शेवटास गेले तर उत्तमच पण संकटाने घेरले, अपुरे राहिले तरीही ते सफल झाले असे समज.
    शर्यत अजुन संपली नाही कारण मी अजुन जिंकलो नाही ! ध्येयाच्या दिशेने उचललेले कुठेलेही पाऊल यशस्वीच असते असा स्वत:बाबत सकारात्मक विचार महत्त्वाचा आहे. स्थिर, प्रगल्भ माणूस यश व अपयश याबाबत आतून समत्वच राहतो. अपयशाच्या वार्‍याने खचून फडफडणार्‍या अंत:करणाचा तो नसतो. ज्या चुकांमुळे यश मिळत नाहीये त्या चुकांना शोधून अधिक कुशलतेमध्ये स्वत:ला तो नेतो यातच यशाचे गमक आहे. किंबहुना अपयश मिळणे हे एक प्रकारे भाग्यलक्षणच आहे. कारण नव्याने चेतना त्या लक्षावर केंद्रित होते, ध्यानमयतेच्या प्रक्रियेत त्याच्या मेंदूच्या अनेक सुप्त शक्ति जागृत होतात. नऊशेनव्व्याण्णव वेळा अपयशी झाल्यावरच हजारव्यांदा एडिसनचा दिवा पेटला होता. आणि ती घटना जगासाठी भाग्यकारक ठरली होती. म्हणून विश्‍वमाऊली निक्षूण सांगते- तू योगयुक्त होऊनि । फलाशासंग टाकूनि। मग अर्जुना चित्त देऊनि। करी कर्म॥2-267॥- हे अर्जुना ! तू निष्काम कर्म करणारा होऊन व ध्येय मिळेल न मिळेल याचा विचार न करता मन लावून कर्मे कर. चित्त देऊनि ! हा माऊलींचा शब्द आपण मंत्रासारखाच चित्तात धारण करायला हवा. जय हरि !

अखंड प्रसन्न राहण्याचा सराव करुयात !

अखंड प्रसन्न राहण्याचा सराव करुयात !

देखे अखंडित प्रसन्नता । आथी जेथे चित्ता। तेथे रिगणे नाही समस्ता। संसारदु:खा॥ज्ञाने.2-338॥

जेथे मन सतत प्रसन्न, प्रफुल्लीत आहे, उल्हसित आहे तेथे संसार दु:खांचा प्रवेश होत नाही.

    परात्पर सद्गुरु ज्ञानदेव बुद्धि स्थिर करण्याच्या युक्त्या सांगत असताना हा महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडतात. रोजच्या आयुष्याचा झगडा करणार्‍याला परमात्मा स्वप्नवत वाटू नये, प्रत्येक कृतीमध्ये त्याचाच दिव्य आविष्कार होत राहावा यासाठी बुद्धिची स्थिरता महत्त्वाची आहे. पण असंख्य वाटांनी मनाची धाव होत राहते. धावणे होते पण पोहोचणे होत नाही. देव मंदिरापुरता व आनंद कल्पनेपुरता मर्यादित राहतो. चेतनेला पंख लाभत नाही व आनंदाला पारखा जीव जन्मोजन्मी परमार्थाच्या दरीवर संसाररुपी वृक्षाच्या पारंब्याला अधांतरी लोंबकळत राहतो. ना धड प्रपंच ना धड परमार्थ ! अशी स्थिती होत राहते. पण आनंदमय जीवन जगणे हा त्या जीवाचा निसर्गदत्त हक्क व अधिकार आहे. अशावेळी विश्‍वाचे अयथार्थ दर्शन होत राहिल्याने दु:खी झालेल्या त्या जीवाला यथार्थतेच्या महामार्गावर आणत असताना सर्वप्रथम प्रसन्नतेचा अभ्यास करण्याची युक्ती सांगतात. प्रसन्नतेच्या या अभ्यासाने माणूस परमार्थातात अग्रेसर राहतोच पण प्रपंचातही नेटकेपणा मिळून करंटेपण सांडून जाते. प्रसन्न व हसरा माणूस हवाहवासा वाटतो. व्यवहारातही अशा कपाळावरील तणावाच्या रेषा पुसलेल्या माणसालाच यश मिळते. त्याची कल्पकता वृद्धिंगत राहते. म्हणून तर आनंदमय अभ्यासाची संकल्पना आज शाळेतही रुजवली जात आहे.
    मन:प्रसाद: सौम्यत्वं ...(मनाची प्रसन्नता, शांत भाव) या शब्दात सतराव्या अध्यायात भगवंत मनाचे तप सांगतात. प्रसन्नता हा चित्ताचा भाग व्हायला हवा असे म्हणतात. आनंद का ढगफुटीसारखा एकदम कोसळत नसतो तर क्षणाक्षणाला त्याचा अभ्यास करत बुद्धि स्थिर करावी लागते. प्रत्येक कृतीमध्ये ध्यानमयता, अपेक्षाभंगाच्या क्षणी खिलाडीवृत्ती दाखवणे, झालं गेलं विसरुन पुढे पुढे जात राहणे, उगाच वादात वेळ दवडण्यापेक्षा क्षमा करत जाणे, चेहर्‍यावर स्मित भाव असणे, नकारात्मक विचार व व्यक्तिंपासून दूर राहणे, मेंदूत अनावश्यक कचरा न भरणे इ. सरावाने हळूहळू ही प्रसन्नता वाढत जाते.
 एका साधूला विचांरले की तुमची साधना कोणती ? तर ते म्हणाले,"मी सदरा घालतानाही त्या कृती इतका आनंद कुठल्याच कृतीत नाही या भावनेने घालतो. प्रत्येक क्षणाला प्रत्येक कृतीत असेच जगतो हिच माझी साधना आहे.' हाच तो प्रसन्नतेचा अभ्यास !
    ज्याप्रमाणे निवार्‍यातील दिव्याची ज्योत मुळीच हालत नाही त्याप्रमाणे प्रसन्न चित्तामुळे स्थिर झालेला पुरुष आत्मस्वरुपाचे ठिकाणी जडलेला असतो. असे माऊली प्रसन्नतेची महती सांगतात. म्हणून प्रपंच व परमार्थात यशासाठी प्रसन्न रहो यारो ! जय हरि !

Wednesday, January 10, 2018

समानता व बंधुतेचा विश्‍वरुप भाव !

समानता व बंधुतेचा विश्‍वरुप भाव !

    म्हणौनि असो ते विशेषे। आपणपेयासारिखे । जो चराचर देखे। अखंडित॥ज्ञाने. 6-404॥- जो ज्ञानी सदोदित आपल्यासारखेच, आत्मरुपाने सर्व चराचरात्मक जग पाहतो.
    गीतेच्या 6 व्या अध्यायाच्या 32 व्या श्‍लोकावर भाष्य करताना ज्ञानदेव सामाजिक समतेचे महत्त्व व सहजीवनाचे आध्यात्मिक रहस्य अधोरेखित करतात. हृदय गाभार्‍यात विठ्ठलाशी आलिंगन होताच कर्ताभाव राहत नाही. त्याचे भागवत आत्मनिवेदन होते, त्याच्या या अव्यभिचारी प्रेमामुळे तो वारकरी सगळीकडे जणू स्वत:चेच स्वरुप पाहू लागतो. वेद या अवस्थेला ‘यज्ञ’ तर अध्यात्मात याला भक्ति असे म्हणतात.
    गुणातीत अवस्थेने सदेह राहून विश्‍वातील सर्व आकारात आपल्याच प्रेमरुप परमात्म्याची आपल्यासहित अनुभूति घेणे म्हणजे विश्‍वरुप होणे होय. निवृत्ती साधन कृष्णरुपे खुण। विश्‍वी विश्‍व पूर्ण हरि माझा॥निवृत्तीनाथ॥ अशी अवस्था लाभलेल्या वारकर्‍याच्या आचरणाला प्रेमळ, अहिंसामय म्हणावे. बाकी प्रकृतिअधीन सामान्य जीव हिंसा करत नसतील तरी त्या वृत्तिला हिंसेचा अभाव म्हणावे; अहिंसा नव्हे ! ही प्रेममयताच मुक्तिचे खरे द्वार आहे.
    आपणचि विश्‍व जाहला। तरी भेदभावो सहजचि गेला। म्हणोनि द्वेषु ठेला। जया पुरुषा॥ज्ञाने.12-191॥
    विश्‍वाप्रति हा भेदभाव पूर्ण नाहिसा होण्याकरता भक्तिची वारी करावीच लागते. आत्मज्ञानाच्या शिखरावर भक्तिचा कळस चढेपर्यंत ब्रह्मज्ञ पुरुषही अपूर्णच म्हणावे लागतात. तो कळस चढल्यावर विश्‍वप्रेम उफाळल्यावर संतांचा समत्वाने विहार चालू असतो. 
    भजनाची व्याख्या करताना समर्थ रामदासस्वामी म्हणतात- कोणी एक भेटो नर। धेड महार चांभार। राखावे तयाचे अंतर । या नाव भजन॥ आज 21 व्या शतकातही भारतीय मन मनुष्याला मनुष्य म्हणून नव्हे तर कुठल्यातरी जातीचा, समाजाचा म्हणून बघते. शिक्षण घेऊनही जातीचे कंगोरे अधिकच धारधार झालेले दिसतात. अशा लोकांना समर्थांसारखे संत सांगतात की ’जातीच्या चष्म्यातून बघताना ती भगवत्ता त्याच्याही हृदयात तितक्याच समर्थपणे उपस्थित असल्यामुळे त्याच्या अंत:करणाचे रक्षण करावे. अर्थात त्याला आदराने वागवावे. हेच खरे भजन आहे.’
    स्वामी विवेकानंद म्हणतात- ‘हाय दुर्दैव ! देशाच्या गरीबाचा कोणी विचार करत नाही. तेच खरे देशाचे मेरुदंड आहेत. जे आपल्या परिश्रमाने अन्न निर्माण करतात. हे मेहतर आणि मजुर जर यांनी एक दिवसासाठी काम बंद केले तर शहरभर भयंकर स्थिती निर्माण होईल. पण त्यांच्याकडे सहानुभूतिने कोण बघतो ?’ अर्थात ही स्थिती बदलण्यासाठी भागवतपंथीय संतांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. समत्वाचा, बंधुतेचा भाव भागवतपंथात ठळकपणे अभिव्यक्त होताना दिसतो. माझ्यासारखाच तोही आहे याचा आनंद घेण्यासाठीच आनंदाची वारी आपण करायला हवी. 
जय हरि !

मी भक्त तूं देव ऐसे करीं॥

मी भक्त तूं देव ऐसे करीं॥

    भक्तिमार्गात आंधळ्या प्रेमालाच श्रद्धा म्हणतात. कारण तिथे अज्ञातात झेप असते. इथे तर्काची शहाणी नजर नसते.
    संदेहाचा भयाण दुष्काळ सहन केल्यावर श्रद्धेच्या गडद काळ्या मेघातून तो काळा भगवंत कृपेच्या सहस्रधारांनी कोसळू लागतो, अकारण आनंदाचे चारी दिशांना इतस्तत: वाहत जाणार्‍या पाण्याचे गोड आवाज आसमंतातून येऊ लागतात. आणि बांध घालणाराच वाहून गेलेला असतो. समर्पणाचा तो सृजन सोहळा भक्ताच्या आंतर्सृष्टित रांत्रदिवस चालु असतो. ईश्‍वर मधुप्रेमाची अष्टसात्त्विक वीणा झंकारते, भक्तिचा पखवाजाचा नाद ही अनाहद होतो. रंध्रारंध्रातून संगीत पाझरतं, पाय अनासायास नृत्य करतात. त्या भक्ताच्या अस्तित्वातून एकच ध्वनी उमटत असतो- विठ्ठल ! विठ्ठल !
    जगन्नाथपुरीला चैतन्य प्रभु त्या निळ्या समुद्राची निळाई बघुन भावमग्न झाले व त्याकडे झेपावले. काली मातेच्या मूर्तीला फुलं वाहता वाहता ती स्वत:ला वाहणारे रामकृष्ण, तिचं नाव घेताच भावमग्न होतात, तिला आई म्हणत संवादही साधतात मग अद्वैतवादी तोतापुरी महाराजांना ते अज्ञान वाटते. भाववंतांची भावस्थिती त्या ज्ञानवंतांना समजणं अवघड जातं.
    पण हा भक्तिचा आनंदसोहळा सुरु होण्याआधी भक्ताची वेगळी स्थिती असते.
    सुफी संत बायजीद मशीदीत चिंतन करत असता खिडकीतून पक्षी मशीदीत प्रवेश करतो. बाहेर परत जाण्याचा दुसरा मार्ग न सापडल्यामुळे तो भिंतींना धडका मारत बसतो. त्याच्या गोंधळलेल्या स्थितीकडे बघताना बायजीद विचार करतो. आपलीही या पक्षासारखी स्थिती आहे. ज्यामार्गाने आलो तोच मुक्तिचा मार्ग आहे पण त्याच मार्गाने बंधनातही टाकले आहे असे वाटुन दुसरा मार्ग शोधत आपण संसारांच्या भिंतींना जन्मोजन्मी धडका मारत बसलो आहोत.
    जगात आगमनाचे द्वार प्रेम आहे. ते सांसारिक वासनेचे प्रेम उलटे झाले की भक्ति होते. प्रेमाच्या दिशेचे परिवर्तन भक्ति आहे.  हे उमगताच ठेचकळणारा मुमुक्षु भक्तीच्या दिशेने चालू लागतो.
    जिथे दोन आहेत आणि तरीही एकाची अनुभूति आहे तेव्हा योग होतो. पण जिथे एकच एकपण आहे तिथे दोघांतील योग संभव नाही. मिलनाची अट आहे ती म्हणजे तिथे दोघे हवेत. दोन वेगवेगळे अस्तित्व असतानाही एकत्वाचा अनुभव आला कि तो भक्तियोग होतो. किनारे दोन आहेत पण मधुन नदी मात्र एकच वाहत आहे अशी ही स्थिती आहे. वर वरचे द्वैत हवंये पण आंतर्स्थितीत अद्वैत आहे.        
    सगळ्यात विलक्षण गंमत म्हणजे या मिलनामध्ये तो भगवंतच आपल्यासाठी आतुर आहे, पण संदेह, अज्ञाताची भिती, अहं ती मिलनाची स्थिती येऊ देत नाही. बरं त्या परमात्म्याला वेळेची चिंता नाही. तो कालातीत आहे. तो बंद खिडकीबाहेर ताटकळत असलेल्या सूर्यकिरणांसारखा आहे. आपणच खिडकी उघडायची खोटी तो आत यायला आतुर आहेच. फक्त हवे अहंचे विसर्जन.
    मन जिथे संसाराला जोडलेले असते त्या जोडाला अहंकार म्हणतात तो जोड जाड भिंतीसारखा असतो जिथून सत्य दिसत नाही. तेच मन जिथे परमात्म्याला जोडलेले आहे त्या जोडाला अस्मिता म्हणतात. तिथला जोड काचेच्या भिंतीसारखा असतो. सत्य दर्शन होत असते पण मिलन नसते. सबीज समाधी. ती अस्मिता म्हणजे सूक्ष्म अहंकार. बुद्ध ज्याला आत्मा म्हणतात. म्हणून ते त्याला नाकारतात. कारण आत्मा-परमात्मा हे द्वैत राहतेच. पण भक्तिमार्गात एकाचवेळी द्वैत व अद्वैताचा चिद्विलास चालु असतो. तो तसा हवा असतो. किंबहुना त्या भक्तिची मिराशी घराण्यात परंपरेने आलेली आहे असेही संतांना म्हणताना आपण बघतो.
    आणि इये कृष्णमूर्तीची सवे। यालागी सोय धरिली जीवे। तंव नको म्हणौनि देवें। वारिलें मातें॥ज्ञा.-12-22 आणि मला तुमच्या सगुण कृष्णमूर्तीची सवय असल्यामुळे माझ्या मनाने तिचीच आवड घेतली, तोच देवा ! आपण तेथे प्रेम ठेवू नको असे बजावून माझा निषेध केला.
    जीवाचा जीवपणा राखुन ठेवून त्याच्या ठिकाणी आत्मवेदना व आत्मज्ञान खेळविण्याची लीला भगवत कृपेचाच भाग आहे.
    आत्मज्ञ भक्ताची एक आत्मवेदना असते. अद्वैतामुळे आत्मज्ञाची एकाकी अवस्था त्या भक्ताला बैचेन करते, आणि नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव। मी भक्त तूं देव ऐसें करीं॥ (तुकाराम 2278) अशी गोड भावपूर्ण प्रार्थना तो करु लागतो. आदी शंकराचार्यांचे स्मरण येते. वेदांतावर भाष्य करणारे परब्रह्म लिंगम्। भजे पांडुरंगम्॥ म्हणत गाऊ लागतात. तेव्हा ती आत्मवेदना आत्मनिवेदन झालेली असते. हेचि घडो मज जन्म जन्मांतरी । मागणे श्रीहरी नाहि दुजे॥ हीच ती आत्मज्ञ भक्ताची अवस्था.
    भक्तिजीवन हीच तत्त्वार्थियांची अभ्यर्थना होय. भगवंताने दाखवलेल्या सत्यरुपाच्या सोहळ्यापेक्षा भक्ताच्या स्वानुभुतिचा आनंद वरचढच आहे म्हणून विराट अनंत रुपाचा साक्षी झालेला अर्जुन जो दोन्ही सुखाचा ज्ञाता सावळ्या रुपातच सुखी आहे.
    पवित्र नद्यात पाण्याची खोली कोणी बघत नाही तर जिच्या दर्शनात, प्राशनात व स्पर्शांत पावित्र्याचा उल्हास असतो. तिच पवित्र नदी असेच आपण म्हणतो. तो विराट् दीर्घकाय असेलही पण सगुण दिव्यकाय आहे. त्याची गोडी वाटणं हा भक्ताचा स्वधर्म आहे. स्वभाव आहे.
    निर्गुण गुणिले गुण हा गुणाकार सगुण होय! सगुणत्वात ओतलेले समग्र निर्गुणत्व निर्गुणासह सगुण होते. स्वात्मविग्रहाची लीला तेथे वर्तत असते. सच्चिदानंदाचा विग्रह जर सगुण हाच असेल तर त्याची गोडी का न अनुभवावी ?
    सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण। ब्रह्म सनातन विठ्ठल हा॥ स्वसौंदर्याने कोटि काामदेवांना जो झांकतो त्या कृष्णच्या प्रितीसाठी आम्हाला कोणी गावंढळ वा सगुण वेडे म्हटले तरी पर्वा नाही !
जय हरि !